Latest

Womens T20 World Cup: भारताविरुद्ध कांगारूंचे पारडे जड

रणजित गायकवाड

पोर्ट एलिजाबेथ, पुढारी ऑनलाईन : womens t20 world cup : महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना रंगणार असून येत्या गुरुवारी (दि. 23) केपटाऊन येथे ही लढत होईल. भारतीय संघ सलग तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत (2018, 2020, 2023) पोहोचला आहे.

ऑस्ट्रेलिया संघ आतापर्यंत अजिंक्य

गत विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियन महिला संघाने, दरवेळप्रमाणे टी-20 विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. यंदाच्या स्पर्धेत सलग चार सामन्यांत चार विजय मिळवून 'ग्रुप ए'मध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. त्याच वेळी, 'ग्रुप बी'मध्ये भारतीय संघाने 4 पैकी 3 सामने जिंकले आहेत. त्यामुळे इंग्लंडनंतर त्यांना दुसरे स्थान मिळाले आहे. इंग्लंडविरुद्धच्या ग्रुप स्टेज सामन्यात भारताला 11 धावांच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला होता. (womens t20 world cup)

सातपैकी पाच विश्वचषक ऑस्ट्रेलियाच्या खात्यात

आतापर्यंत सात महिला टी-20 विश्वचषक स्पर्धा पार पडल्या आहेत. सध्या द. आफ्रिकेत सुरू असलेली ही आठवी स्पर्धा आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलिया संघाने या जागतिक स्पर्धेची अंतिम फेरी सलग सहावेळा गाठली असून यातील पाच विश्वचषकावर आपले नाव कोरण्यात यश आले आहे. 2016 मध्ये कोलकातामध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या फायनलमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. गेल्या स्पर्धेच्या फायनलमध्ये भारताचा ऑस्ट्रेलियाने पराभव केला होता. अशा स्थितीत यंदाच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियन संघाचा पराभव करणे भारतासाठी आव्हानात्मक असेल. (womens t20 world cup)

कांगारूंचे पारडे जड

भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघांमध्ये आतापर्यंत एकूण 30 सामने खेळले गेले आहेत. यापैकी ऑस्ट्रेलियाने 22 आणि भारताने 7 सामने जिंकले आहेत. तर एका सामन्याचा निकाल लागला नाही. टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात दोन्ही संघांमध्ये एकूण 5 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी 3 ऑस्ट्रेलियाने आणि 2 भारताने जिंकले आहेत. गेल्या वेळी भारताने साखळी फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता पण अंतिम फेरीत त्यांना विजयाची पुनरावृत्ती करता आली नाही. (womens t20 world cup)

SCROLL FOR NEXT