पुढारी ऑनलाईन: वैद्यकीय शास्त्रानुसार, निरोगी शरीरासाठी चांगली आणि गाढ झोप घेणे खूप महत्वाचे आहे. पण गेल्या 4 वर्षांपासून एका महिलेला झोप येत नाही, असं म्हटलं तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? वास्तविक, काही दिवसांपासून एका महिलेच्या दुर्मिळ आजाराची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. मालगोर्झाटा स्लिविन्स्का या 39 वर्षीय पोलीस महिलेला 4 वर्षांपासून झोप येत नाही. या महिलेला झोप न येण्याचे कारण तिचा मेंदू कधीही काम करणे थांबवत नाही. आम्ही तुम्हाला त्या महिलेच्या आजाराची संपूर्ण कहाणी सांगतो.
द सनच्या रिपोर्टनुसार, मालगोर्झाटा सोमनीफोबिया नावाच्या दुर्मिळ आजाराने ग्रस्त आहे. आजारपणामुळे ती अनेक रात्री अजिबात झोपू शकत नाही. ती जवळपास 1400 दिवस सतत जागी असते. याचा परिणाम तिच्या निरोगी व सामाजिक जीवनावर होत आहे. आजारपणामुळे तिचे डोळे खूप थकतात. डोळ्यांना सूज येते. तसेच, या आजारामुळे तिला तीव्र डोकेदुखी आणि शॉर्ट टर्म मेमरी लॉस समस्येला सामोरे जावे लागते. या दुर्मिळ आजाराने तिची शॉर्ट टर्म मेमरी पूर्णपणे नष्ट केली आहे.
या अहवालांवर विश्वास ठेवला तर, मालगोर्झाटाला 2017 मध्ये तिच्या आजारपणाबद्दल माहिती मिळाली जेव्हा ती स्पेनमधून तिच्या सुट्टीवरून परत आली. तेव्हापासून तिची झोप गायब झाली. झोपण्यासाठी खूप प्रयत्न करूनही यश येत नव्हते. झोपेच्या गोळ्यांचीही मदत घेतली पण झोप काही तासच मिळायची. गोळ्यांच्या अतिसेवनामुळे तिची तब्येतही बिघडू लागली त्यामुळे तिला गोळ्या सोडून द्याव्या लागल्या. सध्या ती पोलंडमधील डॉक्टरांकडून उपचार घेत आहे आता मालगोर्झाटा आठवड्यातून 2-3 रात्री झोपते. यासोबतच ती नियमितपणे योगा आणि व्यायामही करत आहे, जेणेकरून तिची या आजारापासून पूर्णपणे सुटका होईल.