Latest

Chandrapur News: देह सोडलेल्या आईच्या कुशीत रात्रभर ढसाढसा रडला चिमुकला; पुलावरून पडून गर्भवती महिलेचा मृत्यू

अविनाश सुतार

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा :  वेळ सायंकाळची… चिमुकल्या मुलाने आईजवळ खाऊची मागणी केली… चिमुकल्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आई बाळाला घेऊन स्कुटीवरून त्याला घेऊन निघाली… पुलावरून जाताना वाहनावरील नियंत्रण सुटले… आई चार वर्षाच्या बाळासह नदीत पडली…डोक्याच्या भारावर चिखलात पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला… सुदैवाने मात्र चिमुकला बचावला…देह सोडून गेलेल्या आईच्या मायेसाठी चिमुकला रात्रभर मृतदेहाजवळ ढसा ढसा रडत राहिला. हृदयाला पाझर फोडणारी ही घटना बल्लारपूर राजूरा मार्गावरील बाम्हणी जवळील वर्धानदीच्या पुलाखाली घडली. गुरूवारी (दि. १९) सकाळी ही घटना समोर आली. सुषमा पवन काकडे (वय 29) असे मृत  महिलेचे नाव आहे. तर चार वर्षाच्या दिवेन्श याला पोलिसांनी रूग्णालयात उपचारार्थ भरती केले आहे. (Chandrapur News)

मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य प्लाझा बामणी येथे सुषमा पवन काकडे (वय 29) ही महिला राहत होती. तिला पती व चार वर्षाचा दिवैन्श नावाचा मुलगा आहे. सध्या ती गर्भवती होती. बुधवारी (दि. १८) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास दिवैन्शने खाऊ देण्याची मागणी आईजवळ केली. मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी सुषमा पतीला सांगून  (एमएच 34 बी एम 4770) या मोपेडवरून मुलाला खाऊ घेऊन देण्यासाठी राजुऱ्याला निघाली होती. बल्लारपूर राजूरा मार्गावरील बाम्हणीजवळील वर्धा नदीवर मोठे पूल आहे. या पुलावरून राजूराकडे जात असताना तिचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. आणि ती पुलावरून दुचाकी घेऊन थेट चिमुकल्यासह नदीत पडली. नदीत चिखल पाणी असल्याने आणि डोक्याच्या भारावर पडल्याने ती चिखलात बदल्या गेली. आणि तिचा जागीच मृत्यू झाला. चार वर्षाचा चिमुकलाही आईसोबत नदीत कोसळला, पण नशीब बलवत्तर तो चिखल, पाण्यात न पडता थेट आईजवळ पडून जखमी झाला. (Chandrapur News)
 चिमुकला आईच्या कुशीत पडून ढसा ढसा रडू लागला. देह सोडून गेलेली आईची कोणतीही हालचाल दिसत नसल्याने चिमुकल्याचे  रडणे रात्रभर सुरूच राहिले. बल्लारपूर राजूरा मार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. कर्कश आणि भरधाव रात्रीच्या वाहतुकीमुळे नदीतील ही घटना कुणाच्या लक्षात आली नाही. मुलाला घेऊन गेलेली आई न आल्याने कुटुंबिय चिंतेत पडले. परंतु रात्रभर त्याचा पत्ता लागला नाही.  गुरूवारी पहाटेच्या सुमारास शोधाशोध सुरू असताना आणि वाहनांची वर्दळ सकाळी कमी असल्यामुळे नदीवरील पुलाच्या खाली मुलाचा रडण्याचा आवाज ऐकू आला. कुटुंबिय घटनास्थळी पोहचले. लगेच बल्लारपूर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी क्षणाचाही विलंब न करता दाखल झाले. दोघांनाही बाहेर काढून बल्लापूर येथील ग्रामीण रूग्णालयात हलविले. वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर आई सुषमा हिला मृत घोषीत केले. तर चार वर्षाच्या दिवैन्शवर उपचार सुरू केले.  सध्या त्याची प्रकृती स्थित असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Chandrapur News  : त्यांना नदीची लागली होती ओढ

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत सुषमा काकडे यांचे मानसिक उपचार सुरू होते. तसेच त्या संदर्भात डॉक्टरांकडून औषधे देखील सुरू होती. मात्र, त्या तीन महिन्याच्या गर्भवती असल्याकारणाने आणि बाळावर विपरीत परिणाम होण्याच्या धोक्याने डॉक्टरांनी त्यांना औषध बंद करण्याचा सल्ला दिला असल्याची माहिती समोर आली आहे. सुषमा या नेहमी नदीचा उल्लेख करायच्या, त्यांना नदीचे ओढ लागली होती. प्राथमिक तपासात देखील ही माहिती समोर आली आहे. या संदर्भात पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. मात्र, त्यांना नदीची ओढ लागल्याने आणि त्यांचा मृत्यू नदीतच झाल्याने पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत. या प्रकरणाचा तपास बल्लारपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे करीत आहेत.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT