चंद्रपूर: पोंभुर्ण्यात वनविभागाच्या कार्यालयासमोर आदिवासी बांधवांचा ठिय्या | पुढारी

चंद्रपूर: पोंभुर्ण्यात वनविभागाच्या कार्यालयासमोर आदिवासी बांधवांचा ठिय्या

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा :  पोंभूर्णा येथील इको पार्कमधील आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या वास्तुंची तोडफोड व समाजाचा झेंडा काढून फेकल्याने संतप्त झालेल्या आदिवासी बांधवांनी काल मंगळवार पासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आज बुधवारी दुसऱ्या दिवशीही शेकडो आदिवासी बांधवांचे आंदोलन सुरूच ठेवले आहे.

चंद्रपूर जिल्हातील पोंभुर्णा येथे इको पार्कची निर्मीती करण्यात आली होती. यामध्ये आदिवासी समाजाच्या संस्कृतीचे दर्शन घडविण्याच्या उदेश्याने इको पार्क मध्ये विविध वास्तू उभारण्यात आल्या होत्या. परंतु काही दिवसात पार्कची दुरावस्था होऊन पार्क भंगार मध्ये निघाला. वनविभागाने या वास्तूंची तोडफोड केली. तसेच इको पार्कमध्ये असलेला आदिवासींचा झेंडा काढून फेकल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकारामुळे आदिवासी बांधवांमध्ये संताप उफाळून आला. या प्रकाराचा तिव्र निषेध व्यक्त करीत काल मंगळवार दुपारपासून शेकडोंच्या संख्येत आदिवासी बांधवांनी वनविभागाच्या कार्यालयासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. सायंकाळी आंदेालन मागे घेण्यात येईल, अशी शक्यता असताना आंदोलनकांनी त्याच ठिकाणी रात्र जागून काढली.

आज बुधवारी हे ठिय्या आंदोलन सुरूच आहे. परिस्थीतीचे गांभीर्य बघता पोंभुर्ण्यात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा पोंभूर्णा हा विधानसभा क्षेत्र आहे. यापूवीही आदिवासी बांधवांचा मोठा आंदोलन झालेला आहे. त्यांनतर पुन्हा कालपासून वनविभागाच्या विरोधात आंदोलनाचे अस्त्र उगारण्यात आले आहे.

हेही वाचा 

Back to top button