पुढारी ऑनलाईन डेस्क: मधुमेहाच्या ( डायबेटिज ) रुग्णसंख्येत दिवसेंदिवस होणारी वाढ ही चिंताजनक बाब आहे. मधुमेह ही गंभीर समस्या आहे. वेळीच त्याकडे लक्ष न दिल्यास त्याचा इतर अवयवांवर देखील परिणाम होतो. शुगरचे प्रमाण वाढल्याने शरीरातील हृदय, किडनी, फुफ्फुस, मेंदू या महत्त्वाच्या अवयांवर त्याचा परिणाम होऊन त्याला धोका निर्माण होतो. म्हणून वेळीच काळजी (Winter Diet for Diabetics) घेणे गरजेचे असते.
हिवाळ्यात पचनसंस्था वेगाने काम करते. त्यामुळे वारंवार भूक लागते. सततच्या खाण्याने त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. यामुळे वजन देखील वाढते. त्यामुळे ऋतुनूसार वेळा, दिनचर्या आणि आहारात योग्य बदल केल्यास शुगर नियंत्रणात ठेवता येतो. म्हणून विशेषत: हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेणे अधिक महत्त्वाचे असते. चला तर पाहूया हिवाळ्यात शुगर असणाऱ्या रुग्णांच्या आहार चार्टमध्ये (Winter Diet for Diabetics) कोणत्या गोष्टींचा समावेश पाहिजे.
शुगर असणाऱ्या रूग्णांनी नाश्त्याची विशेष काळजी घ्यावी. नाश्त्यामध्ये फायबर आणि प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करावा. नाश्त्यामध्ये विशेषत: उकडलेली अंडी, रताळे, मोसमी फळे (संत्री, पेरू, मोसंबी) यांसारख्या पदार्थांचा समावेश करावा. कारण अधिक फायबर असलेले पदार्थ शुगरच्या रूग्णांसाठी अधिक फायद्याचे असते.
दुपारच्या जेवणात शक्यतो फायबरयुक्त आहार घ्यावा. कारण फायबरयुक्त अन्न सेवनामुळे रक्तातील शुगरचे प्रमाण नियंत्रणात राहते. त्यामुळे हिवाळ्यात दुपारच्या जेवणात हिरव्या पालेभाज्या-फळभाज्या, मिक्स पिटांची पोळी, गाजर, मुळा यांसारखे पदार्थांचा समावेश करावा.
हिवाळ्यात रात्रीच्या जेवणात शुगर रूग्णांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. शुगर असणाऱ्या व्यक्तींनी या दिवसात रात्रीच्या जेवणात फक्त हलका आहार द्यावा. कारण इतर रूग्णांच्या तुलनेत शुगर असणाऱ्यांची अन्न पचन प्रक्रिया ही मंद असते. त्यामुळे शुगर असणाऱ्या रूग्णांनी रात्रीच्या जेवणात वेगवेगळ्या प्रकारचे सूप, हिरव्या पालेभाज्या, सॅलेड, मल्टीग्रेन चपाती असा आहार घ्यावा.