Latest

Kolhapur News | उद्योजक संतोष शिंदेंनी मुलगा, पत्नीसह जीवन का संपवले? बेडरुममध्ये सापडली चिठ्ठी

दीपक दि. भांदिगरे

गडहिंग्लज : पुढारी वृत्तसेवा, येथील अर्जुन उद्योग समुहाचे प्रमुख संतोष वसंत शिंदे (वय ४६) यांनी शुक्रवारी मध्यरात्री पत्नी तेजस्विनी (वय ३६) व मुलगा अर्जुन (वय १४) यांच्यासह जीवनयात्रा संपविली. आज (दि.२४) पहाटे ही घटना उघडकीस आली. दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांनी प्राथमिक तपासात संतोष शिंदे यांनी आधी पत्नी व मुलाचा गळा चिरुन त्यांना संपविल्यानंतर स्वतःचेही जीवन संपविले असल्याचे सांगितले. तसेच त्यांच्या बेडरुममध्ये विषसदृश बाटली व चिठ्ठीही आढळल्याचे त्यांनी म्हटले आहे. उत्तरीय तपासणीनंतर या प्रकरणाचा संपूर्ण खुलासा होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. (Kolhapur News)

संतोष शिंदे यांच्या मृत्यूच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीयांसह नागरिकांनी एकत्र येत त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्यांवर कारवाई केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका मांडत गडहिंग्लज (Gadhinglaj) बंदची हाक दिली. (Kolhapur News)

उद्योजक शिंदे हे समाजाशी समरस असे व्यक्तिमत्त्व असल्याने गडहिंग्लजच्या बंदच्या हाकेला सर्वांनी प्रतिसाद देत संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवली. तसेच शिंदे यांच्या निवासस्थानी सर्वपक्षीयांसह नागरिकांनी एकत्र येत जोवर यातील दोषींना अटक होत नाही, तोवर मृतदेह हलवू देणार नसल्याची भूमिका घेतली. महेश कोरी, संतोष चिकोडे, महेश सलवादे, नागेश चौगुले आदींसह सर्वपक्षीयांनी कारवाईची मागणी केल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला होता.

यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी राजीव नवले, पोलिस निरीक्षक गजानन सरगर यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर नागरिक शांत झाले. यानंतर उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह कोल्हापूरला पाठविण्यात आले. उद्योजक शिंदे यांनी पत्नी व मुलासह जीवनयात्रा संपविल्याने त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असणार्‍यांबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. यातील आरोपींवर कडक कारवाई झाली पाहिजे, अन्यथा अशा प्रवृत्ती बळावतील अशा प्रतिक्रिया उमटल्या. (Kolhapur News)

का उचलले टोकाचे पाऊल?

गडहिंग्लज शहरातील प्रसिद्ध उद्योगपती संतोष शिंदे यांनी आपल्या पत्नी व मुलासह आज राहत्या घरी जीवन संपवल्‍याचे आज निदर्शनास आले. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला होता. त्या आरोपांमध्ये त्यांना जवळपास महिनाभराची जेलवारी करावी लागली होती. त्यानंतर ते बऱ्याच प्रमाणात ताणतणावात होते. तुरुंगातून आल्यानंतर पुन्हा नव्याने उभारी घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता, मात्र त्यामध्ये काही प्रमाणात अपयश येत असल्याचे दिसून आले होते.

संतोष शिंदे यांनी अगदी लहान वयातच मोठ्या प्रमाणात भरारी घेत अर्जुन उद्योग समूहाची स्थापना केली होती. या अंतर्गत तेल उत्पादन, व्यायाम शाळा, बेकरी उत्पादने यासह विविध प्रकारची उत्पादने तसेच महाराष्ट्रासह मुंबई, कर्नाटकामध्येही त्यांनी उद्योग विस्तारला होता. अशा परिस्थितीत ते जीवन संपवतील असे कोणालाही वाटले नव्हते, मात्र शुक्रवारी रात्री त्यांनी राहत्या घरी पत्नी मुलासह जीवन संपवले.

आज (शनिवार) सकाळी ते बेडरूमचा दरवाजा उघडत नसल्याने त्यांच्या आईने अन्य शेजाऱ्यांना बोलवले असता दरवाजा तोडून आत मध्ये प्रवेश केल्यानंतर बेडरूम मध्ये तिघांचे मृतदेह आढळले. यावेळी त्यांच्या मानेवर जखमा आढळल्या प्राथमिक अंदाजानुसार सुरुवातीला विष पिऊन व त्यानंतर गळ्यावर सुरी फिरवून घेऊन त्‍यांनी जीवन संपवल्‍याचे लक्षात येते. यामध्ये शिंदे यांनी पत्नी व मुलासह  जीवन संपवले आहे. (Kolhapur News)

 हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT