नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
रशिया आणि युक्रेन (Russia-Ukraine War) या दोन देशांत २०१४ला युद्ध झालेले होते. पुतिन यांचे पाठबळ असलेल्या बंडखोरांनी युक्रेनमधील बराच मोठा भूभाग बळकावला होता. तेव्हापासून युक्रेनचे सैन्य आणि हे बंडखोर यांच्यात चकमकी सुरू आहेत. युक्रेन पूर्वी सोव्हिएट रिपब्लिकचा भाग होते. पण युक्रेनचा कल हा युरोपीय देश आणि पाश्चात्य राष्ट्रांकडे जास्त आहे. पुतिन नेमहीच युक्रेनला पाश्चात्य देशांच्या हातातील बाहुले मानतात. युक्रेनने नाटोमध्ये सहभागी होऊ नये, युक्रेनने न्युट्रल राष्ट्र म्हणून राहावे, अशी पुतिन यांची भूमिका आहे.
युक्रेनमध्ये रशियन भाषा बोलली जाते, शिवाय दोन्ही देशांची संस्कृतीही समानच आहे. पण २०१४ नंतर दोन्ही राष्ट्रांतील (Russia-Ukraine War) संबंध बिघडले आहेत. रशियाच्या बाजूने असलेल्या राष्ट्राध्यक्षांना युक्रेनमध्ये पदच्युत केल्यानंतर रशियाने युक्रेनवर हल्ला केला होता, या युद्धात १४ हजार लोकांचा बळी गेला होता. डोन्सटेक आणि लुहानस्क या युक्रेनच्या दोन भागांत रशियाच्या माध्यमातून कथित लोकशाही सरकार आहेत. रशिया या भागांना स्वतंत्र राष्ट्र मानते. युक्रेनमधील या दोन भागांना विशेष दर्जा मिळणे अपेक्षित होते, पण पुतिन यांच्यामुळेच ते होऊ शकलेले नाही.
डोन्सटेक आणि लुहान्सकमधील बंडखोर त्यांच्या ताब्यात असलेल्या भूभागावर हक्क सांगत नाहीत, तर या संपूर्ण प्रदेशावरच (Russia-Ukraine War) हक्क सांगत आहेत. युक्रेनने या प्रांतात वंशसंहार सुरू केला आहे, अशी बतावणी करत रशियाने पूर्ण युद्धाची तयारी सुरू केली, प्रत्यक्षात युद्धही सुरू केले. पुतिन फक्त या दोन भागांत हल्ले करून थांबणार नाहीत तर ते युक्रेनच्या राजधानीवरही हल्ला करतील, असे मानले जाते.
युक्रेन या नाटोचा सदस्य होता कामा नये ही रशियाची सर्वांत महत्त्वाची मागणी आहे, अशी भूमिका रशियाचे उपपरराष्ट्र मंत्री सर्जी रायब्कोव यांनी मांडली आहे. १९९४ला रशियाने केलेल्या करारानुसार युक्रेनेचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व मान्य करण्यात आले होते, पण गेल्या वर्षी पुतिन यांनी रशिया आणि युक्रेन एक राष्ट्र (Russia-Ukraine War) असल्याचे म्हटले होते. तसेच आताचा युक्रेन हा कम्युनिस्ट रशियामुळे निर्माण झाला आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले होते. जर युक्रेन नाटोमध्ये सहभागी झाले तर हे देश क्रिमिया ताब्यात घेण्याचा प्रयत्न करू शकतात, असे त्यांना वाटते.