Latest

आज ‘करा किंवा मरा’; विंडीजविरुद्धच्या तिसर्‍या सामन्यात भारतासाठी आणीबाणीची स्थिती

मोहन कारंडे

गयाना; वृत्तसंस्था : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा टी-20 सामना मंगळवारी (दि. 8) होत आहे. या मालिकेत भारतीय संघ आताच्या घडीला 'करा किंवा मरा'च्या स्थितीत आहे. मालिकेतील सुरुवातीचे दोन सामने जिंकून यजमान संघाने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे टीम इंडियासमोर आगामी सामन्यात मोठे आव्हान असणार आहे.

तिसर्‍या सामन्यातील विजय वेस्ट इंडिजच्या संघाला मालिका जिंकवून देईल, तर पराभव पाहुण्या भारतीय संघाला मालिका गमवायला लावेल. मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी आज विजय मिळवावाच लागेल, तर मालिका जिंकण्यासाठी टीम इंडियाला उरलेले तिन्ही सामने जिंकावे लागणार आहेत.

या 'फायनल' सामन्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. दुसर्‍या सामन्यातील पराभवानंतर भारतीय कर्णधार हार्दिक पंड्याने फलंदाजांवर खापर फोडले होते. रविवारी झालेल्या दोन विकेटस्च्या पराभवानंतर हार्दिक म्हणाला की, फलंदाजांना अधिक जबाबदारीने खेळावे लागेल. आम्ही आणखी 10-15 धावा करायला हव्या होत्या. 2016 मध्ये शेवटच्या वेळी भारताचा वेस्ट इंडिजकडून द्विपक्षीय टी-20 मालिकेत पराभव झाला होता. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने गमावल्यानंतर भारत 0-2 ने पिछाडीवर आहे.

टी-20 स्पेशालिस्ट म्हणून विडींजच्या संघाची ओळख आहे. या फॉरमॅटमध्ये फलंदाजांना पहिल्या चेंडूपासूनच आक्रमकपणे खेळावे लागते; परंतु आतापर्यंत भारताचे आघाडीचे फलंदाज इशान किशन, शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादव यांना अशी खेळी करण्यात अपयश आले आहे.
आघाडीचे फलंदाज अपयशी ठरत असल्यामुळे संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांच्यावर दबाव वाढत आहे. नवोदित तिलक वर्माने मात्र दोन्हीही सामन्यांमध्ये (39) आणि (51) अशी साजेशी खेळी केली. सध्या फॉर्ममध्ये असलेला फिरकीपटू कुलदीप यादव अंगठ्याच्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. पण, तिसर्‍या सामन्यात तो खेळणार का हे पाहण्याजोगे असेल.
दोन महिन्यांनंतर खेळत असलेला यजुवेंद्र चहल प्रभावी ठरला, पण रवी बिश्नोईला काही खास कामगिरी करता आली नाही. वेगवान गोलंदाज मुकेश कुमारने खूप धावा दिल्या, त्यांच्या जागी आवेश खान किंवा उम्रान मलिकला संधी दिली जाऊ शकते.

पाच सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाला सलग दुसर्‍या पराभवाचा सामना करावा लागला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय कर्णधार हार्दिक पंड्याला भोवला. पण, तिलक वर्माने अर्धशतक झळकावून संघाची लाज राखली. टीम इंडियाने निर्धारित 20 षटकांत 7 बाद 152 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, 153 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजच्या संघाने 18.5 षटकांतच लक्ष्य गाठले अन् 2 गडी राखून विजय मिळवला.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT