Latest

Weather Update | कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता, यलो अलर्ट जारी

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

Weather Update : हवामान विभागाने येत्या ५ दिवसांसाठी महाराष्ट्रात जिल्हानिहाय हवामानाचा अंदाज जाहीर केला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तर २ ते ४ दिवस विदर्भातील काही भागांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

हवामान विभागाने २ जून रोजी नाशिक, अहमदनगर, रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, पुणे, बीड, परभणी, नांदेड, सोलापूर या जिल्ह्यांत तर ३ जून रोजी सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. तर ५ आणि ६ जून रोजीही या जिल्ह्यांत यलो अलर्ट कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर सावधगिरी बाळगण्यासाठी यलो अलर्ट जारी केला जातो.

नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनने कर्नाटकातील कारवार पर्यंत धडक मारली आहे. यामुळे तो उद्यापर्यंत तळकोकणात पोहण्याची शक्यता आहे. तसेच तो ईशान्य भारताचा काही भाग, बंगालच्या उपसागराच्या काही भागात दाखल झाला आहे. मान्सून पुढे सरकरण्यासाठी अनुकूल स्थिती असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

मान्सून वायव्य दिशेकडील बंगालच्या उपसागराच्या काही भागात आणि पूर्वमध्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात तसेच मिझोराम, मणिपूर आणि नागालँडच्या बहुतांश भागातून पुढे सरकला असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

पुढील २ दिवसांत मान्सून (Weather Update) मध्य आणि उत्तरेकडील बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात, ईशान्येतील राज्यांच्या उर्वरित भागात तसेच पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या काही भागांमध्ये पुढे सरकरण्यासाठी अनुकूल स्थिती असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

आसाम, मेघालयात पुढील २ ते ४ दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणामध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

SCROLL FOR NEXT