Latest

Weather forecast | राज्यात पावसाचे पुनरागमन! ‘या’ भागांत जोरदार पावसाचा अंदाज : IMD

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. यामुळे शेतकरी चिंतेत होता. पण आता राज्यातील बहुतांश भागांत जोरदार पाऊस परतणार असल्याचे संकेत हवामान विभागाने (IMD) दिले आहेत. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील विदर्भात १९ आणि २० ऑगस्ट दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सगळीकडे हलका ते मध्यम स्वरुपाच्या आणि तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. (Weather forecast)

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने विदर्भ, मराठवडयासह मध्य भारतात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. नागपुरात बऱ्याच दिवसांनी काल शुक्रवारी पावसाने हजेरी लावली होती. पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या आहेत.

दरम्यान, पुढील ३ ते ४ दिवसांत पश्चिम हिमालयीन प्रदेशात आणि लगतच्या मैदानी भागात पुढील २४ तासांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. द्वीपकल्पीय भारताचा दक्षिण भाग आणि गुजरातमध्ये पुढील ४-५ दिवसांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. २१ ऑगस्टपासून पूर्व आणि ईशान्य भारतात पावसाचे प्रमाण वाढणार असल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे.

वायव्य बंगालचा उपसागर आणि लगतच्या पश्चिम बंगाल-उत्तर ओडिशा किनार्‍यावरील कमी दाबाचा पट्टा पश्चिम-वायव्य दिशेकडे सरकला आहे आणि आता तो उत्तर छत्तीसगड आणि शेजारच्या भागावर आहे. पुढील २४ तासांत तो मध्य प्रदेशाच्या पश्चिम-वायव्य दिशेकडे सरकण्याची शक्यता आहे. यामुळे पुढील ५ दिवसांत पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

गेल्या २४ तासांत पश्चिम बंगाल, सिक्कीम, मध्य प्रदेशचा पूर्व भाग आणि छत्तीसगडमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. तसेच तेलंगणा, आसाम, मेघालया, दिल्ली, मध्य प्रदेशचा पश्चिम भाग, ओडिशा, विदर्भ, अरुणाचल प्रदेश आणि कर्नाटकच्या किनारी भागात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची नोंद झाली आहे. (Weather forecast)

 हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT