Latest

नगर: गणेशच्या सभासदांनी दिलेला निकाल आम्ही स्वीकारला : राधाकृष्ण विखे पाटील

अमृता चौगुले

संगमनेर (नगर), पुढारी वृत्तसेवा: गणेश सहकारी साखर कारखान्याचा प्रत्येक सभासद हा या साखर कारखान्याचा खरा मालक आहे. त्यामुळे सभासदांनी दिलेला कौल आम्हाला मान्य आहे आणि त्यांनी दिलेला निर्णय आम्ही स्वीकारला असल्याचे स्पष्ट मत राज्याचे महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गणेश साखर कारखान्याच्या निकालावर व्यक्त केले.

संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी येथील जनसेवा मंडळाचे नेते भास्करराव दिघे यांच्या पत्नी सुरेखाताई दिघे यांच्या प्रथम स्मृतीदिनाच्या निमित्ताने महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील कोल्हेवाडी येथे आले होते. त्यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना मंत्री विखे म्हणाले की, गणेश साखर कारखाण्यात जनसेवा मंडळाचा नेमका पराभव कशामुळे झाला याचे आत्मपरीक्षण करण्याची खरी गरज आहे.

गणेश साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या माध्यमातून तुमच्या दहशतीचे अखेर झाकण पडले याबाबत विचारले असता मंत्री विखे म्हणाले की, गणेश साखर कारखान्याच्या विजयाचा आनंद त्यांना जेवढा घ्यायचा आहे, तेवढा घेऊ द्या. त्यांच्या आनंदात मी कुठलाही व्यत्यय आणत नाही. परंतु, विजयी सभेत त्यांनी उत्साहाच्या भरामध्ये अगदी भान विसरून टीका केली आहे. ती त्यांना करू द्या. मात्र, वेळ आल्यावर त्यावर नक्की बोलू असा टोला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना लगावला.

भाजपने शिवसेनेबरोबर युती केली आणि विधानसभेच्या निवडणुका लढविल्यामुळे शिवसेनेचे ५० आमदार निवडून आले होते. शिवसेनेने भाजपबरोबर सरकार स्थापन न करता ज्यांना कुठल्याही प्रकारचा जनाधार नाही अशा काँग्रेस व राष्ट्रवादी बरोबर केवळ सत्तेच्या लाचारी पोटी भाजपच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून गेले आणि अडीच वर्ष सरकार चालवले. यावरू नेमकी गद्दारी कोणी केली याचे तुम्हीच आत्मपरीक्षण करावे, असा टोला उद्धव ठाकरे यांना लगावला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सर्वांचे संघटनात्मक कौशल्य असल्यामुळे मागील पाच वर्षांपूर्वी मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस होते. मात्र, यावेळी एकनाथ शिंदे हे जरी मुख्यमंत्री असले, तरी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनाच जनतेची मुख्यमंत्री म्हणून सर्वात जास्त पसंती आहे . राज्यातील भाजप- शिवसेना युतीच्या सरकारला लोकांची आजही पसंती आहे आणि उद्याही राहील. पुढील विधानसभा निवडणुकीत राज्यात पुन्हा भाजप-शिवसेना युतीची सत्ता येईल. हा जो सर्वे केला आहे, तोही खरा असल्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे म्हटले आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT