Latest

हिवाळ्यातच टँकरने पाणीपुरवठ्याची नामुष्की !1173 गावांमध्ये पाणीटंचाईची शक्यता

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात 5 हजार कोटींच्या जलजीवन योजना सुरू असतानाही जिल्हा परिषदेवर काही गावांना हिवाळ्यातच टँकरने पाणीपुरवठा करण्याची नामुष्की ओढवली आहे. संगमनेरच्या दोनआणि पाथर्डीच्या 10 गावांसाठी सद्यःस्थितीला 9 टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, संबंधित गाव-वाड्यांतील सुमारे 21 हजार 633 लोकांची तहान याच टँकरद्वारे भागविली जात आहे. टँकरची ही सुरुवात येणार्‍या उन्हाळ्यातील पाणीटंचाईची भीषण दाहकता दाखविणारी आहे.

जिल्ह्यात या वर्षी लाभक्षेत्रात अत्यल्प पाऊस झाल्याने ओढे, नाले वाहिले नाहीत, छोटे-मोठे तलाव, बंधारेही भरले नाहीत, त्यामुळे भूगर्भातील पाणीपातळी वाढली नाही; उलट ती कमी कमी होत आहे. हिवाळ्यातच अनेक भागात ती खालावली आहे.
जिल्हा परिषदेतून या वर्षी उन्हाळ्यातील टंचाईसदृश परिस्थिती लक्षात घेता 85 कोटींचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला आहे. यात 1185 गावे आणि त्याअंतर्गतची 3886 वाड्यांना संभाव्य टंचाईत टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. मात्र या टंचाईच्या झळा नोव्हेंबरपासूनच सुरू झाल्या आहेत. संगमनेर तालुक्यातील पानोडी आणि ठाकरवाडी परिसराला शासकीय टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. दररोज दोन खेपा पाणी दिले जात आहे. तर पाथर्डीतील 10 गावे आणि 49 वाड्यांना दररोज 8 टँकरद्वारे 34 खेपा मंजूर करण्यात आलेल्या आहेत. दिवसेंदिवस टँकरची मागणी वाढणार असल्याने प्रशासनाने तशी तयारी पूर्ण केली आहे.

टँकरसाठी 83 कोटींची तरतूद; निविदा मागविल्या

दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता 1 हजार 173 गावे आणि 3 हजार 708 वाड्यांना पाणीटंचाई झळा बसण्याची शक्यता आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने टँकरपुरवठा संस्थांकडून 1 जानेवारीपर्यंत ऑनलाईन टँकर निविदा मागवल्या आहेत. टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाने 83 कोटींची तरतूद केली आहे. त्यामुळे यंदा निविदा दाखल करणार्‍या संस्थांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
राज्य शासनाने जिल्ह्यातील 96 महसूल मंडलांत दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली. टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागासाठी 84 कोटी 47 लाख 20 हजार रुपयांचा तर चार नगरपालिका क्षेत्रासाठी 2 कोटी 25 लाख रुपये असा एकूण 86 कोटी 72 लाख 20 हजार रुपयांचा टंचाई आराखडा तयार केला आहे. यामध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी तब्बल 83 कोटींची तरतूद केली आहे.

जानेवारी- फेब्रुवारीपासून जिल्ह्यातील पाणीटंचाई झळा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 1 हजार 173 गावे आणि 3 हजार 708 वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने ऑनलाईन निविदा मागवल्या आहेत. 1 जानेवारी दुपारी 2 वाजेपर्यंत निविदा दाखल करता येणार आहेत. प्राप्त झालेल्या ऑनलाईन निविदा 2 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात उघडण्यात येणार आहेत. पाणीटंचाईग्रस्त गावांची संख्या अधिक असल्यामुळे निविदा दाखल करणार्‍या संस्थांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे.

संरक्षित रक्कम 2.49 कोटींची
निविदा दाखल करताना मोटार वाहतूक संस्थेला प्रत्येक निविदेसाठी 2 लाख रुपये बयाणा रक्कम भरावी लागणार आहे. टँकर निविदा 2 जानेवारी रोजी उघडण्यात येणार आहे. ज्या मोटार वाहतूक संस्थेला टँकरचा ठेका मिळणार आहे. त्या संस्थेला तब्बल 2 कोटी 49 लाख रुपये संरक्षित रक्कम ठेवावी लागणार आहे. ही रक्कम डिसेंबर 2024 पर्यंत काढता येणार नाही.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT