Latest

सासवडमधील तयारीचा लेखाजोखा, जिल्हाधिकार्‍यांनी दिली पालखी तळाला भेट

अमृता चौगुले

सासवड, पुढारी वृत्तसेवा: संत ज्ञानेश्वर माउलींच्या पायी आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या मार्गावरील मुक्कामाच्या ठिकाणी बुधवारी (दि. 8) जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, आळंदी संस्थानचे पदाधिकारी आणि प्रशासकीय यंत्रणेकडून पाहणी करण्यात आली. सासवड येथील पालखी तळावर भेट देऊन जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी तयारीचा आढावा घेतला. यावर्षी माउलींचा पालखी सोहळा दि. 24 आणि 25 जून रोजी त्यांचे धाकटे बंधू संत सोपानकाकांच्या सासवड नगरीत विसावणार आहे.

सासवडला माउलींचा पालखी सोहळा दोन दिवस मुक्कामी असतो. त्यामुळे येथील पालखी तळावर आरोग्य, स्वच्छता, वैद्यकीय सेवा, पोलिस, वीज यंत्रणा, गॅस सिलिंडर पुरवठा, आपत्कालीन व्यवस्था चोख ठेवा. परिसरातील ज्या विहिरी किंवा उद्भवातून दिंड्यांचे टँकर भरणार त्याचे जलशुद्धीकरण व विहिरींचे अधिग्रहण लवकर करण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी सूचना दिल्या. यावेळी पोलिस निरीक्षक अण्णासाहेब घोलप, पालिका मुख्याधिकारी निखिल मोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता महेंद्र पाटील, पालिका पाणीपुरवठा अभियंता रामानंद कळस्कर, आरोग्य प्रमुख मोहन चव्हाण, संतोष गिरमे, संभाजी जगताप आदी उपस्थित होते.

पालखी तळावरील पूर्वेकडील भागाचे सपाटीकरण सुरू केले असून पावसाचे पाणी काढून देण्यासाठी पाईप आणल्याचे सांगून काम प्रगतिपथावर असल्याचे मुख्याधिकारी मोरे व चव्हाण यांनी सांगितले. पालखी येण्यापूर्वी तळाची दोन वेळा संपूर्ण स्वच्छता होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सोहळ्यावेळी दिवे घाटापासूनच सासवड परिसरात चोख बंदोबस्त व वाहतूक नियंत्रित करणारी यंत्रणा असेल, असे पोलिस अधिकार्‍यांनी सांगितले. सासवडमध्ये संत सोपानदेव ट्रस्टची हिवरकर मळ्याजवळ जमीन आहे. ती पालखीस किंवा दिंड्यांना उतरण्यासाठी देण्याची तयारी ट्रस्टने दाखविली आहे. भविष्यात अशा जागेची गरज लागणार असल्याचे माउलींचे पालखी सोहळा प्रमुख अ‍ॅड. विकास ढगे पाटील यांनी जिल्हाधिकारी देशमुख यांना सांगितले. या प्रस्तावावर विचार करू, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

https://youtu.be/IYYU1mogoqk

SCROLL FOR NEXT