Latest

Chhatrapati Shivaji Maharaj | शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी! शिवरायांची वाघनखे ब्रिटनमधून परत आणण्याचा मार्ग मोकळा

दीपक दि. भांदिगरे

मुंबई; पुढारी ऑनलाईन : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांनी विजापूर सल्तनतचा सेनापती अफजल खानचा वध करण्यासाठी वापरलेली वाघनखे आता ब्रिटनमधून महाराष्ट्रात परत आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वाघनखे परत करण्याचे ब्रिटनच्या अधिकाऱ्यांनी मान्य केले आहे. यासंदर्भात राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार या महिन्याच्या शेवटी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यासाठी लंडनला जाणार आहेत. शिवरायांनी वापरलेली वाघनखे सध्या ब्रिटनमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियममध्ये ठेवली आहेत. आता ही वाघनखे परत करण्याबाबत व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियमसोबत सामंजस्य करार केला जात आहे.

जगदंबा तलवारीपाठोपाठ छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघनखे राज्यात परत आणणार असल्याची घोषणा याआधी सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. या घोषणेमुळे राज्यातील तमाम शिवप्रेमींनी तसेच इतिहास संशोधकांनी आनंद व्यक्त केला होता.

जर सर्व काही नियोजनाप्रमाणे झाले तर, वाघनखे या वर्षीच घरी आणू शकतो. "आम्हाला ब्रिटनच्या अधिकाऱ्यांकडून पत्र मिळाले आहे. त्यात त्यांनी आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे परत देण्याचे मान्य केले आहे. हिंदू कॅलेंडरनुसार शिवरायांनी अफझल खानला ज्या दिवशी मारले; त्या दिनानिमित्त आपल्याला वाघनखे परत मिळू शकतील. इतर काही तारखांचाही विचार केला जात असून वाघ नखे परत आणण्याच्या पद्धतीही आखल्या जात आहेत," असे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

"करारावर स्वाक्षरी करण्याव्यतिरिक्त आम्ही शिवरायांची जगदंबा तलवार यांसारख्या इतर वस्तूदेखील परत आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत ज्या ब्रिटनमधील म्युझियममध्ये ठेवल्या आहे. वाघनखे परत आणणे हे महाराष्ट्र आणि राज्यातील जनतेसाठी एक मोठी गोष्ट आहे. ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार अफझल खानचा वध केल्याची तारीख १० नोव्हेंबर आहे. पण आम्ही हिंदू तिथी कॅलेंडरनुसार तारखांचा विचार करत आहोत आहोत," असेही मुनगंटीवार यांनी नमूद केले.

छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) वाघनखे हा इतिहासाचा अमूल्य ठेवा असून त्यांच्याशी राज्यातील जनतेच्या भावना जोडलेल्या आहेत. त्यासाठी वाघ नखे हस्तांतरणाची वैयक्तिक जबाबदारी असून ती काळजीपूर्वक केली पाहिजे, असेही सरकारकडून सांगण्यात आले आहे.

यासाठी मुनगंटीवार यांच्यासह प्रधान सचिव सांस्कृतिक डॉ. विकास खर्गे आणि राज्याच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे हे लंडनमधील व्ही. अँड ए. आणि इतर संग्रहालयांना भेट देतील, असे सांस्कृतिक कार्य विभागाने जारी केलेल्या सरकारी ठरावात म्हटले आहे. या ठरावानुसार, तीन सदस्यीय टीमच्या २९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर दरम्यानच्या सहा दिवसीय दौऱ्यासाठी महाराष्ट्र सरकार सुमारे ५० लाख रुपये खर्च करणार आहे.

शिवराज्याभिषेक दिनाला २०२४ साली ३५० वर्षे पूर्ण होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पुढच्या वर्षी वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे याआधी राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे.

 हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT