पुढारी ऑनलाइन डेस्क : W. Bengal-Raging Death : पश्चिम बंगालमधील जादवपूर विद्यापीठात रॅगिंगमुळे एका प्रथम वर्षीय विद्यार्थ्याने आपले जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. जाधवपूर विद्यापीठाच्या विद्यार्थी वसतिगृहाच्या दुसऱ्या मजल्यावरून बुधवारी रात्री 11.45 वाजता या विद्यार्थ्याने उडी मारली. त्यानंतर त्याला जवळच्या एका रुग्णालयात भरती करण्यात आले होते. उपचारादरम्यान गुरुवारी सायंकाळी 4.30 वाजता त्याचा मृत्यू झाला. 'स्वप्नदीप कुंडू' असे या मयत विद्यार्थ्याचे नाव असून त्याने जाधवपूर विद्यापीठात बंगाली भाषेच्या पदवीसाठी प्रवेश घेतला होता.
घटनेनंतर त्याच्या आई तसेच प्रथम वर्षातील अन्य विद्यार्थ्यांनी सिनिअर विद्यार्थ्यांकडून रॅगिंग केली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्याच्या आईने म्हटले आहे की घटनेच्या आधी त्याने फोन केला होता. यावेळी त्याने त्याला वसतिगृहात राहायचे नसल्याचे सांगितले होते. तसेच त्याला याठिकाणी शिकायचे नाही आहे त्यामुळे तू येऊन मला घेऊन जा असे त्याने आईला म्हटले होते. त्यावेळी त्याच्या आईने त्याला समजावून सांगितले. तसेच तिने त्याला लवकरात लवकर निघून येण्यास सांगितले होते. याशिवाय त्याच्या आईने असेही सांगितले की ती त्याला घेण्यासाठी गुरुवारी येणार होती. मात्र, त्यापूर्वीच तिला त्याच्या मृत्यूबाबत कळवण्यात आले.
याशिवाय त्याच्या सोबत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी देखील सिनिअर विद्यार्थी त्याच्यावर सतत रॅगिंग करत असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या माहितीनुसार, सिनिअर विद्यार्थ्यांच्या रॅगिंगमुळे स्वप्नदीप सातत्याने तणावात राहत होता. इतकेच नव्हे त्याने त्याच्या वर्गमित्रांसोबत याची चर्चा देखील केली होती आणि ही रॅगिंग कधी थांबेल असेही त्याने विचारले होते, अशी माहिती त्याच्या सोबत शिकणाऱ्या त्याच्या वर्गमित्रांनी दिली आहे. याशिवाय अनेक जणांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकूनही त्याची रॅगिंग होत असल्याचे म्हटले आहे.
स्वप्नदीपच्या वर्गमित्रांनी दावा केला आहे की, सिनिअर विद्यार्थी त्याला रूममध्ये नग्न होण्यास भाग पाडायचे नंतर त्याला गे म्हणून चिडवायचे. या प्रकारामुळे तो खूप हैराण झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नदीप हा दुसऱ्या मजल्यावरील खोलीत राहत होता. त्याने बुधवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास याच मजल्यावरून उडी मारली. तो जमिनीवर पडला होता तेव्हा त्याच्या शरीरावर कपडे नव्हते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्याला नग्न करून रॅगिंग होत असल्याच्या दाव्याला पुष्टी मिळत आहे. बुधवारी रात्री जेव्हा हाच प्रकार घडला तेव्हा त्याला ते सहन न झाल्याने त्याने अखेर बालकनीतून उडी मारली.
पोलिसांच्या माहितीनुसार, मयत विद्यार्थ्यांसोबत बुधवारी रात्री रॅगिंगनंतर तो प्रचंड तणावात होता. त्याचा व्यवहार सामान्य नव्हता. त्याने विद्यापीठाच्या अधिष्ठात्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता. याशिवाय अन्य विद्यार्थ्यांनी देखील बुधवारी रात्री 10 वाजता अधिष्ठाते रजत रे यांना संपर्क करून स्वप्नदीपची माहिती दिली होती. मात्र, त्यांनी या विषयावर आपण सकाळी बोलू या असे म्हटले होते. दरम्यान याविषयी रजत रे यांनी सध्या तरी काहीही बोलण्यास टाळले आहे, अशी माहिती प.बंगालच्या स्थानिक माध्यमांनी दिली आहे.
स्वप्नदीपला बंगाली पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला होता. विद्यापीठ प्रशासनाने चौकशी समिती स्थापन केली असून, ही समिती दोन आठवड्यांत अहवाल सादर करणार आहे. स्वप्नदीपने बाल्कनीतून उडी मारल्याचे प्राथमिक तपासात पुढे आल्याचे पोलिसांनी सांगितले.
हे ही वाचा :