Latest

Sehwag vs Prithvi Shaw : सेहवागने पृथ्वी शॉला फटकारले, म्हणाला; ‘शुबमन गिलकडून काहीतरी शिक’

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Sehwag vs Prithvi Shaw : पृथ्वी शॉ त्याच्या चुकांमधून धडा घेत नसल्याचे दिसत आहे. त्याने शुबमन गिलकडून काहीतरी शिकणे गरजेचे आहे, असे स्पष्ट मत टीम इंडियाचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने व्यक्त केले आहे.

पृथ्वीवर साधला निशाणा

गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात पुन्हा एकदा पृथ्वी शॉ स्वस्तात बाद झाला. मोहम्मद शमीच्या बाउन्सरवर फटका मारण्याच्या नादात पृथ्वीने अलझारी जोसेफच्या हाती झेल दिला. तो केवळ 7 धावा करू शकला. त्याआधी लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पृथ्वीला मार्क वुडने अवघ्या 12 धावांवर बाद केले होते. अलीकडच्या काळात पृथ्वीने निराशाजनक कामगिरी केली आहे. तो मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरत असल्याने सेहवागने पृथ्वीवर निशाणा साधला आहे.

सेहवाग पुढे म्हणाला, पृथ्वी आणि शुबमन गिल हे दोघेही टीम इंडियाच्या अंडर-19 संघासाठी एकत्र खेळले आहेत. पण यात शुबमन गिल सरस वाटत असून त्याने स्वत: त्यासाठी परीश्रम घेतल्याचे स्पष्ट दिसते. शुबमनने भारतासाठी खेळताना तिन्ही फॉरमॅटमध्ये मजबूत खेळ दाखवला आहे. दुसरीकडे पृथ्वी हा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये धावा करत आहे. मग त्याला टीम इंडियात संधी का दिली जात नाही अशी ओरड अनेकांकडून केली जात आहे. पण अशा लोकांणी पृथ्वी हा आयपीएलमध्ये धावा काढण्यासाठी संघर्ष करत असल्याचे पहावे, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

'शुभमन गिल आजच्या काळात पृथ्वी शॉच्या पुढे गेला आहे. गुजरात विरुद्धच्या सामन्यात पृथ्वीने बेजबाबदार शॉट खेळला. अशाप्रकारे विकेट गमावण्याची ही त्याची पहिलीच वेळ नाही. याआधीही पृथ्वी असे खराब फटके मारून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. पण तो त्याच्या चुकांमधून काहीच शिकत नसल्याचे दिसत आहे. पृथ्वीने आयपीएलचा उपयोग वेगाने धावा करण्यासाठी मजबूत व्यासपीठ म्हणून केला पाहिजे,' असा सल्लाही त्याने दिल्लीच्या सलामीवीरास दिला.

पृथ्वीचा बेजबाबदार शॉट (Sehwag vs Prithvi Shaw)

चेन्नई सुपर किंग्जच्या ऋतुराज गायकवाडचा उल्लेख करताना सेहवाग म्हणाला की त्यानेही आयपीएल 2021 च्या हंगामात 600 धावा केल्या होत्या. या सीझनमध्येही तो अप्रतिम फॉर्म दाखवत आहे. त्यामुळे आता पृथ्वीला सावध राहण्याची गरज असून त्याला आयपीएलमधील धावांची संख्या वाढवायची आहे. पृथ्वीला सर्वोत्तम खेळ दाखवावा लागेल अन्यथा त्याचे भवितव्य टांगणीला लागेल यात शंका नाही, अशी भविष्यवाणीही सेहवागने केली.

एक नजर आकडेवारीवर

पृथ्वी शॉने 65 डावांमध्ये 24.72 च्या सरासरीने आणि 147.3 च्या स्ट्राइक रेटने 1607 धावा केल्या आहेत. यात 12 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत एकही मोठी खेळी साकारलेली नाही त्यामुळे त्याची खराब कामगिरी संघासाठी निराशाजनक ठरत आहे.

SCROLL FOR NEXT