Latest

Virat Kohali : टी-२० वर्ल्डकपसाठी विराट संघात हवाच

मोहन कारंडे

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : टी-२० वर्ल्डकपसाठी (T20 World Cup) आम्हाला कोणत्याही परिस्थितीत विराट कोहली संघात हवा आहे, असा भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने 'बीसीसीआय'कडे आग्रह धरला आहे, असा दावा माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांनी एक्सवरील पोस्टमधून केला आहे.

भारतात 'आयपीएल'ची धामधूम सुरू होत आहे; पण त्याचवेळी अमेरिका, वेस्ट इंडिजमध्ये जून महिन्यात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपची (T20 World Cup) तयारीही सुरू आहे. निवड समितीने भारताचे १६ जणांचे पथक जवळपास निश्चित केले आहे. खेळाडूंची उपलब्धता आणि दुखापती यावर काही जागा अडल्या असल्यातरी बहुतांश युवा खेळाडूंनी संघात स्थान पक्के केले आहे; पण भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली टी-२० विश्वचषक (T20 World Cup) संघातून वगळला जाऊ शकतो, असा दावा मीडिया रिपोर्टस्मध्ये केला जात आहे. असे वृत्त टेलिग्राफने दिले होते आणि नंतर ते वणव्यासारखे पसरले; पण आता माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांच्या एक्सवरील पोस्टमुळे चर्चा सुरू झाली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा विराट कोहलीबाबत म्हणाला की, आम्हाला कोणत्याही परिस्थितीत विराट कोहली संघात हवा आहे.

भारताच्या १९८३ विश्वचषक संघातील माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांनी द्विटरवर कोहलीचा फोटोसह एक पोस्ट शेअर केली आहे. कोहलीचा फोटो शेअर करताना कीर्ती आझाद यांनी मोठी माहिती दिली आहे. पोस्टमध्ये कीर्ती आझाद म्हणाले, टी २० वर्ल्डकपमध्ये युवा खेळाडूंना स्थान मिळावे, असे निवड समितीच्या आणि 'बीसीसीआय'च्या पदाधिकाऱ्यांना वाटते. या फ्रेममध्ये विराट कोहली फिट बसत नाही, असे बहुतांश जणांचे मत आहे. 'बीसीसीआय'चे सचिव जय शहा यांनी विराट या संघात असावा की, नसावा याबाबत इतर निवडकर्त्यांशी बोलण्याची आणि त्यांना समजावण्याची जबाबदारी अजित आगरकर यांना दिली होती. त्यासाठी १५ मार्चपर्यंतची वेळही देण्यात आली होती. सूत्रांच्या मते अजित आगरकर यासाठी ना निवडकर्त्यांना विराटबद्दल समजवू शकले ना स्वतःला पटवून देऊ शकले. त्यानंतर जय शहा यांनी रोहितला विराटबद्दल विचारले; तेव्हा रोहित म्हणाला, आम्हाला कोणत्याही परिस्थितीत विराट कोहली संघात हवा आहे. त्यामुळे टी-२० विश्वचषक खेळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याची अधिकारीक घोषणा संघ निवडीपूर्वी केली जाईल.

'ती' अविश्वसनीय खेळी कशी विसरायची?

विराट कोहली हे नाव जागतिक क्रिकेटमधील किती मोठे आणि महत्त्वाचे नाव आहे, याचा अंदाज सर्वांनाच आहे. विराटने त्याच्या तडाखेबंद फलंदाजीच्या जोरावर अनेकदा भारतासाठी एकहाती सामने जिंकले आहेत. याचे ज्वलंत उदाहरण मागील टी-२० विश्वचषकातीलच आहे. गेल्या टी-२० विश्वचषकातही (T20 World Cup) कोहली संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. २०२२ च्या टी-२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध भारताच्या विजयात विराट कोहलीचे योगदान कोणीच विसरू शकणार नाही. असे असूनही, कोहलीला 'आयसीसी' टी-२० विश्वचषक २०२४ (T20 World Cup) मध्ये संघाचा भाग नसल्याच्या बातम्या येत होत्या; पण या बातम्यांदरम्यान रोहित शर्माच्या एका वाक्यातून सर्वांच्या मनातील भावना व्यक्त झाल्या आहेत.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT