नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर खासदार विनायक राऊत (Vinayak Raut On Nitesh Rane) यांनी तोंडसुख घेतले आहे. राणेंच्या पिपाणीला आम्ही किंमत देत नाही, असा टोला राऊत यांनी लगावला. दरम्यान, १९ जूनरोजी शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. यापूर्वी १८ जूनला एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यातून विविध विषयांवर मार्गदर्शन केले जाईल, असे राऊत यांनी शुक्रवारी (दि.२) स्पष्ट केले.
राज्यातील विविध विषयांवर बोलताना त्यांनी सत्ताधाऱ्यांनाही टोला लगावला. राऊत यांनी (Vinayak Raut On Nitesh Rane) माजी मंत्री शंभूराजे देसाईसंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर राज्यात राजकीय वातावरण तापले होते. आता या वक्तव्यावरून राऊत यांनी सारवासारव केली आहे. देसाई यांच्यासंदर्भात कुठलेही चुकीचे बोललो नाही. ते मोठे नेते आहेत. मी वेगळ्या शंभूराजे यांच्याबद्दल बोललो होतो. आता मंत्री शंभुराजे जिथे गेले आहेत तिथेच त्यांचे विसर्जन होईल, असा टोलाही त्यांनी लगावला.
गौप्यस्फोट करणार, या खासदार प्रतापराव जाधव यांच्या वक्तव्यावर भाष्य करताना राऊत म्हणाले की, 'तेव्हा तुमचे तोंड का बंद होते? आता काय गौप्यस्फोट करता. आता त्यांच्या विरोधातील आमचा उमेदवार २ लाखांहून अधिक मताधिक्याने विजयी होईल, असा दावा देखील राऊत यांनी केला. देशात महिलांच्या आत्मसन्मानाची गोष्ट सुरू असताना लैंगिक अत्याचाराबाबत आंदोलन सुरू असताना पंतप्रधान, गृहमंत्री आणि कुठलाही केंद्रीय मंत्री यांनी याबाबत कुठलीही चर्चा केली नाही, ही बाब खेदजनक असल्याचे महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनासंदर्भात बोलताना राऊत म्हणाले.
हेही वाचा