Latest

अलंकापुरीत रंगला माउलींचा रथोत्सव

अमृता चौगुले

आळंदी : पुढारी वृत्तसेवा : 

कृपाळु उदार माझा ज्ञानेश्वर ।
तया नमस्कार वारंवार ॥
न पाही याती कुळाचा विचार ।
भक्त करुणाकर ज्ञानाबाई ॥
भलतीया भावे शरण जाता भेटी । पाडीतसें तुटी जन्मव्याधी ॥
ज्ञानाबाई माझी अनाथाची माय ।
एका जनार्दनी पाय वंदितसे ॥

संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त रविवारी (दि. 10) माउलींच्या पालखीची रथातून ग्रामप्रदक्षिणा काढण्यात आली. या रथोत्सवाने अवघी अलंकापुरी भक्तीरसात न्हावून निघाली होती. रथात विराजमान माउलींच्या मुखवट्याचे दर्शन घेण्यासाठी रथाच्या दोन्ही बाजूस वारकरी, भाविकांनी गर्दी केली होती. माउलींची पालखी टाळ- मृदुंगाच्या गजरात दुपारी साडेचारच्या दरम्यान मुख्य महाद्वारातून ग्रामप्रदक्षिणेसाठी बाहेर पडली. पावणेपाच वाजता पालखी गोपाळपुरा येथील श्रीकृष्ण मंदिरात दाखल झाली. मंदिरात विसावल्यानंतर सव्वापाच वाजता पालखीतील माउलींच्या चांदीच्या मुखवट्याला चांदीच्या रथावर विराजमान करण्यात आले.

त्यानंतर आरती होऊन पालखी टाळ- मृदुंगाच्या गजरात साडेपाच वाजता मार्गस्थ झाली. मानाच्या दिंड्यांमधील वारकरी पालखीपुढे चालत होते. गोपाळपुरा रस्त्यावरून पालखी वडगाव चौकात आली असता दिंडीतील वारकर्‍यांनी फेर धरत टाळ-मृदुंगाचा गजर केला. रथासमोर रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. माउलींचा रथ सायंकाळी उशिरा मंदिरात परतला.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT