मुंबई : पुढारी वार्ताहर
मानखुर्दच्या म्हाडा वसाहतीमधील कोयना सोसायटीजवळ ४० ते ४५ अनोळखी तरुणांच्या जमावाने वाहनांची तोडफोड केली. ही घटना रविवारी (दि.११) रात्री घडली. तरूणांच्या हातातील तलवार, लाकडी बांबू व ॲल्युमिनियम पाईपमुळे या भागात काही काळ दहशत पसरली हाेती.
म्हाडा वसाहतीमधील कोयना सोसायटीजवळ हातामध्ये असलेल्या तलवार, लाकडी बांबू व ॲल्युमिनियमच्या पाइपने त्यांनी वाहनांची तोडफोड करायला सुरूवात केली. न्यू म्हाडा कॉलनीमधील कोयना बिल्डींग जवळील रस्त्यापासून ते बिल्डींग क्र.१०४ पर्यंतच्या रस्त्यावर दुतर्फा उभ्या असलेल्या दुचाकी, चारचाकी व रिक्षा अशा अंदाजे २० ते २५ वाहनांच्या काचेची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. यामध्ये मोठे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर हे तरूण घटनास्थळावरून पसार झाले.
या घटनेची दखल घेत परिसरातील नागरिकांनी मानखुर्द पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली . स्थानिक पोलीस या अनोळखी तरुणांचा शोध घेत आहेत. दोन तरुणांच्या आपापसातील वादातून हा प्रकार झाल्याचे समजते.