Latest

Prakash Ambedkar | ‘मविआ’ला धक्का! ‘वंचित’ची जरांगेंसोबत आघाडी, प्रकाश आंबेडकरांचा दावा

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आज बुधवारी लोकसभा निवडणुसाठी राज्यातील 'वंचित'च्या ८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. (Lok Sabha Election 2024) 'वंचित'ने मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी केली असल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. मनोज जरांगे पाटील यांचा आम्हाला पाठिंबा राहणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या राज्य समितीने काँग्रेसच्या नागपुरातील उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रकाश शेंडगे (ओबीसी बहुजन पार्टी) यांना सांगलीतून उमेदवारी दिल्यास त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णयही वंचितच्या राज्य समितीने घेतला असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीने 'वंचित'ला ५ जागांचा प्रस्ताव दिला होता. पण त्यावर आता विचार न करता प्रकाश आंबेडकर नव्या सामाजिक आघाडीची घोषणा केली आहे.

महाविकास आघाडीने जरांगे पाटील फॅक्टर लक्षात घ्यायला पाहिजे होता. पण तो लक्षात घेतला नाही. आम्ही जरागेंसोबत चर्चा केली. त्यांचे समर्थन आम्हाला राहील. आम्ही आता सामाजिक आघाडी तयार केली आहे. आम्ही ओबीसी महासंघाशी युती करणार आहोत. ओबीसी, मुस्लिम, जैन उमेदवार दिले जाणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

जरागें पाटील यांच्यासोबत काल बैठक झाली. या बैठकीत सामाजिक आघाडी पुढे नेण्यावर एकमत झाले. यामुळे नव्या नैतिक राजकारणाची सुरुवात होईल. आमची ही सामाजिक आघाडी मतदार स्वीकारतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

वंचित बहुजन आघाडीने भंडारा -गोंदियातून संजय केवट यांना उमेदवारी दिली आहे. गडचिरोली-चिमूर येथून हितेश पांडुरंग मडावी, चंद्रपूरमधून राजेश बेल्ली, बुलढाणा येथून वसंत मगर, अकोल्यातून प्रकाश आंबेडकर, अमरावती येथून कुमारी प्राजक्ता पिल्लेवन, वर्ध्यातून प्रा. राजेंद्र साळुंके आणि यवतमाळ- वाशीमधून खेमसिंग प्रतापराव पवार यांना उमेदवारी दिली आहे.

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जारंगे पाटील यांच्या भेटीसाठी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर हे काल अंतरवाली सराटीत मध्यरात्री भेटण्याकरीता गेले होते. या दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. त्यानंतर आज बुधवारी आंबेडकर यांनी जरांगे यांच्यासोबतच्या नव्या आघाडीची घोषणा केली.

दरम्यान, अंतरवाली सराटी येथे येत्या ३० तारखेला समाजाची महत्वाची बैठक आहे. या दिवशी समाजासोबत चर्चा करून वंचित सोबतचा निर्णय घेण्यात येईल. माझा मार्ग राजकारण नाही. त्यामुळे समाज जो निर्णय घेईल तो ३० तारखेला जाहीर करू, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. (Lok Sabha Election 2024)

जरागेंसोबत सामाजिक आघाडी

जरांगे पाटील आणि त्यांच्या संघटनेसोबत आमचे एकमत झाले आहे. याला आम्ही समझोता म्हणू शकत नाही. कारण, त्यांचा पक्ष नाही आणि ते पक्ष निर्माण करु इच्छितही नाहीत. यामुळे ही जी सामाजिक आघाडी आहे, ज्याला आम्ही राजकीय स्वरुप देणार आहोत. लोक याला स्वीकारतील. या माध्यमातून नवीन राजकीय सुरुवात होईल, नीतिमत्ता आणि मूल्य यांचे राजकारण सुरु होईल आणि सामान्य नागरिकांचे प्रश्न उठवण्याचे राजकारण सुरू होईल, असे सांगत प्रकाश आंबेडकर यांनी जरागे यांच्यासोबत सामाजिक आघाडी केल्याचा दावा केला.

जरांगे फॅक्टर का आहे महत्त्वाचा?

जे स्वच्छ प्रतिमेचे आहेत, गरीब आहे आणि काहातरी करण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत, त्यांनाच उमेदवारी दिली जाईल. बाकी जागांची अंतिम यादी २ तारखेपर्यंत जाहीर होईल. एक नवी आघाडी आम्ही उभी करत आहोत, जे आमच्यासोबत येऊ इच्छित आहेत त्यांनी आम्ही सांगत होतो की जरांगे पाटील यांच्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. पण ते मान्य करायला तयार नाहीत, असा टोला प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT