पुढारी ऑनलाईन डेस्क: उत्तकाशीत सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना वाचवण्यासाठी राज्य आणि केंद्र प्रशासनाकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. कामगारांना वाचवण्यासाठी गेल्या १५ दिवसांपासून युद्धपातळीवर बचावकार्य केले जात आहे. मात्र बोगद्यातील कामगारांना बाहेर काढण्यासाठी अजून बराचसा काळ लागू शकतो. त्यामुळे या कामरांना दैनंदिन गरजा पुरवण्यांसह, आरोग्य तसेच त्यांचे मनाेधैर्य कायम राहण्यासाठी काळजी घेतली जात आहे. (Uttarkashi Tunnel rescue operation)
बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांची सुटकेसंदर्भात अनिश्चितता असल्याने प्रशासन आणि बचाव यंत्रणेकडून त्यांची सर्वपातळीवर दक्षता घेतली जात आहे. कामगांच्या शारीरिक आरोग्याबरोबरच त्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी देखील घेतली जात आहे. कामगारांची मानसिक स्थिती चांगली राहावी म्हणून, प्रशासनाकडून त्यांना मनोरंजनाचे साहित्य पुरवले जात आहे. कामगारांना लुडो सारखे व्हिडिओ आणि बोर्ड गेम खेळण्यासाठी मोबाईल फोन देण्यात आले आहेत. त्यांचा मानसिक ताण कमी करण्यासाठी सापशिडीचा गेम देखील देण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने 'पीटीआय'शी बोलताना सांगितले. (Uttarkashi Tunnel rescue operation)
बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या अनेक कुटुंबांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांनी बचाव कार्य संथ गतीने सुरू असल्याबाबत तक्रार देखील केली आहे. पुढे कामगारांच्या कुटुंबियांनी आता कामगार निराश आणि अधीर होत असल्याची तक्रार देखील राज्य आणि केंद्र प्रशासनाकडे केली आहे. तर कामगारांच्या काही कुटुंबांनी घटनास्थळीच तळ ठोकला असून, ते अधूनमधून अधिकाऱ्यांकडून ऑपरेशनची स्थिती जाणून घेत आहेत, असे 'इंडिया टुडे'ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. (Uttarkashi Tunnel rescue operation)
बोगद्यात अडकलेल्या कामगारांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी जोडून ठेवण्यासाठी बोगद्यावर लँडलाइन सुविधा उभारण्यात आली आहे. सरकारी बीएसएनएलने ही सुविधा उभारली असून बोगद्यात अडकलेल्या कामगारांना प्रत्येकी हँडसेट देण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांनी माध्यमांनी दिलेल्या माहितीत सांगितले.