Latest

US School Shooting : अमेरिका हादरली! ६ वर्षीय विद्यार्थ्याने शिक्षिकेवर वर्गात गोळी झाडली, शाळेत मुलाकडे बंदूक आली कुठून?

दीपक दि. भांदिगरे

व्हर्जिनिया (अमेरिका); पुढारी ऑनलाईन : अमेरिकेत गोळीबाराच्या घटना वाढतच आहेत. आता तर अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यातील न्यूपोर्ट न्यूज शहरातील एका एलिमेंटरी स्कूलमध्ये एका सहा वर्षाच्या मुलाने शिक्षिकेवर गोळी झाडण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (US School Shooting) या घटनेने व्हर्जिनिया राज्य हादरले आहे. न्यूपोर्ट न्यूज, व्हर्जिनिया येथील रिचनेक एलिमेंटरी स्कूलमध्ये (Rickneck Elementary School) एका शिक्षिकेवर गोळी झाडल्यानंतर शुक्रवारी सहा वर्षांच्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले, असे वृत्त CNN ने पोलीस अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिले आहे.

या घटनेत एका ३० वर्षांच्या महिला शिक्षिकेवर वर्गात गोळी झाडण्यात आली आणि ही घटना अपघाताने घडलेली नाही, अशी माहिती पोलीस प्रमुख स्टीव्ह ड्रू यांनी दिली आहे. "या घटनेतील संशयित हा रिचनेक प्राथमिक शाळेतील ६ वर्षीय विद्यार्थी मुलगा आहे. त्याला ताब्यात घेण्यात आले आहे." असे न्यूपोर्ट न्यूज पोलीस विभागाने (Newport News Police Department) जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे. पोलिसांनी अधिक दिलेल्या माहितीनुसार, "ज्यांच्यावर गोळीबार झाला त्या शिक्षिका आहेत. यात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे."

पोलीस प्रमुख स्टीव्ह ड्रू यांनी सांगितले की, सहा वर्षांच्या मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. बंदुकधारी विद्यार्थी आणि शिक्षिका यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर मुलाने एकच राउंड फायर केला. सीएनएनने पोलिस अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात पुढे म्हटले आहे की संशयित मुलगा ६ वर्षीय विद्यार्थी आहे. तो सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. शिक्षिकेची प्रकृती गंभीर आहे. या घटनेत इतर कोणत्याही विद्यार्थ्यांचा सहभाग नसल्याचे पोलीस प्रमुखांनी सांगितले.

मुलाकडे बंदूक आली कुठून?

"आम्ही तपास लवकरच पूर्ण करू, त्याने गोळीबार का केला हे तपासातून उघड होईल. मुलाकडे बंदूक कुठून आली, तेथे परिस्थिती काय होती," असे सीएनएनने पोलिस अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

गोळीबारानंतर शाळा बंद

न्यूपोर्ट न्यूज पब्लिक स्कूलचे अधीक्षक जॉर्ज पार्कर यांनी सांगितले की, रिचनेक एलिमेंटरी स्कूल सोमवारी बंद राहणार आहे. पत्रकार परिषदेत बोलताना पार्कर म्हणाले की, "मला या घटनेनंतर धक्का बसला आहे आणि मी खूप दुःखी झालो आहे.". (US School Shooting)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT