Latest

US फेडरल रिझर्व्हचा चौथ्यांदा धक्का! महागाई रोखण्यासाठी व्याजदरात पुन्हा ७५ बेसिस पॉइंट्सची वाढ

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेची प्रमुख बँक फेडरल रिझर्व्हने (US Federal Reserve) बुधवारी वाढती महागाई कमी करण्यासाठी व्याजदरात आणखी ७५ बेसिक पॉइंट्सची वाढ केली. फेडरल रिझर्व्हने याआधी २१ सप्टेंबर रोजी व्याजदरात ७५ बेसिक पॉइंटची वाढ केली. आता चौथ्यांदा व्याजदरवाढ केली आहे. अमेरिका गेल्या काही वर्षापासून वाढत्या महागाईचा सामना करत आहे. सप्टेंबरसाठी महागाई दर ८.२ टक्क्यांवर होता. जो फेड रिझर्व्हने निश्चित केलेल्या उद्दिष्टाच्या चारपट जास्त आहे. सप्टेंबरमध्ये फेडचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी सांगितले होते की महागाई दर २ टक्क्यांवर आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

फेडरल ओपन मार्केट कमिटीने म्हटले आहे की अलिकडील निर्देशकांनी खर्च आणि उत्पादनामध्ये वाढ दर्शविली आहे. अलिकडच्या काही महिन्यांत बेरोजगारीचा दर कमी राहिला आहे. पण महागाई वाढतच आहे. कमिटीने पुढे म्हटले आहे की युक्रेन विरुद्ध रशियाच्या युद्धामुळे प्रचंड आर्थिक अडचणी येत आहेत आणि युद्ध आणि संबंधित घटना महागाईवर अतिरिक्त दबाव निर्माण करत आहेत. दीर्घकाळापर्यंत जास्तीत जास्त रोजगार निर्मिती आणि महागाई दर २ टक्क्यांवर आणण्याचा प्रयत्न आहे. या पार्श्वभूमीवर कमिटीने फेडरल फंड दराची लक्ष्य श्रेणी ३-३/४ वरून ४ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

फेडरल रिझर्व्हने (US Federal Reserve) बुधवारी केलेली दरवाढ ही सलग चौथी आहे. सतत दरवाढीमुळे देश मंदीच्या खाईत जाऊ शकतो, अशी भिती व्यक्त केली जात आहे. अमेरिकेतील व्याजदरांचा परिणाम जगभरातील गुंतवणुकीवर होतो, त्यामुळे अनेक देशांचे याकडे लक्ष लागून राहिलेले होते. तर जागतिक बँकेने जगभरातील मध्यवर्ती बँका व्याजदर वाढवत असल्याने त्याचा परिणाम जागतिक जीडीपवर होऊन जगभरात मंदी येऊ शकते, असा इशारा यापूर्वीच दिलेला आहे. फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढवल्याचे पडसाद जगभरातील शेअर बाजरात उमटत आहेत. (Us Fed Interest Rate)

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT