Latest

समित कक्कडच्या ‘३६ गुण’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, असे आपल्याकडे म्हणतात. ग्रह-तारे, पत्रिका, एका भेटीतच साताजन्माच्या गाठी बांधणे वगैरे या सगळयाच्या पलीकडे जाऊन नव्या नात्याची सुरुवात करीत असताना कुंडलीपेक्षा एकमेकांची मतं जुळणं महत्त्वाचं असतं हा विचार मांडणारा समित कक्कड दिग्दर्शित '३६ गुण' मराठी चित्रपट ४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. तत्पूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर लॉच सोहळा नुकताच संपन्न झाला. संतोष जुवेकर आणि पूर्वा पवार यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात पुष्कर श्रोत्री, विजय पाटकर, वैभव राज गुप्ता, स्वाती बोवलेकर हे कलाकार आहेत.

बोल्ड पण विचार करायला लावणाऱ्या धमाकेदार ट्रेलरमधून आजची पिढी लग्न व्यवस्थेतील किचकट, मानसिक ताणतणावाची प्रक्रिया बदलू पाहते आहे, याची झलक पहायला मिळते. नाती आशा-अपेक्षांच्या व्यापारात गोवली जाऊ नयेत. लग्न करणाऱ्या दोघांनीही एकमेकांना समजून घेऊन, प्रत्येक बाबतीत एकमेकांना साथ देणे अतिशय गरजेचे आहे हे प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न '३६ गुण' चित्रपटातून करण्यात आला आहे.

या सोहळ्याला उपस्थित असलेल्या कलाकारांनी यावेळी आपलं मनोगत व्यक्त केले. वेगळ्या अंगाने लग्नाचा विचार व्हायला हवा हे आवर्जून सांगितले. या चित्रपटात मुख्य भूमिकेत असणारा संतोष सांगतो, 'माझी आतापर्यंतची रावडी इमेज बदलणारा हा चित्रपट आहे. वेगळी भूमिका करायला मिळल्याचा नक्कीच आनंद आहे. तर पूर्वा सांगते की, 'खूप दिवसांनी मी चित्रपटात काम केलं आहे. आमचं टीमवर्क तुम्हाला या चित्रपटात दिसेल'. पुष्कर श्रोत्री म्हणाला, लग्न झालेल्या व न झालेल्या प्रत्येकाने हा चित्रपट पहायला हवा. नात्यांमध्ये समतोल साधणं खूप महत्त्वाचा असतो हे अधोरेखित करणारा हा चित्रपट आहे.

लग्न झालेल्या जोडप्यांचे अनुभव विचारात घेत चित्रपटाचे कथानक तयार करण्याक आले आहे. आतापर्यंत कधीही न दिसलेलं लंडन आणि आजच्या तरुणाईचं प्रतिबिंब दाखवणारा हा चित्रपट असल्याचं दिग्दर्शक समित कक्कड सांगतात.

'द प्रॉडक्शन हेडक्वार्टर्स लि' व 'समित कक्कड फिल्म्स निर्मित '३६ गुण' चित्रपटाची निर्मिती मोहन नाडार, समित कक्कड, संतोष जुवेकर आणि सावित्री विनोद गायकवाड यांची आहे. निखिल रायबोले, भूपेंद्रकुमार नंदन यांच्या कॅफे मराठीने या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. चित्रपटाची कथा, पटकथा समित कक्कड आणि हृषिकेश कोळी यांची आहे. संवाद हृषिकेश कोळी यांचे आहेत. छायाचित्रण प्रसाद भेंडे तर संकलन आशिष म्हात्रे, अपूर्वा मोतीवाले-सहाय यांचे आहे. मंगेश कांगणे यांच्या गीतांना अजित परब यांचे संगीत लाभले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT