मॉस्को ; वृत्तसंस्था : रशियाने युक्रेनवर हल्ला केला आणि बहुतांश जग रशियाविरुद्ध एकवटले. युद्धात कुठल्याही देशाने प्रत्यक्ष सहभाग घेतलेला नसला तरी सर्वांनीच रशियावर निर्बंध लादले. निर्बंधांमुळे खवळलेल्या रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी लगोलग अण्वस्त्रे वापरण्याची धमकी दिली आणि नंतर पुढे सारे चित्रच पलटून गेले. (Ukraine Russia war)
अमेरिकेसह नाटो फौजा युक्रेनच्या मदतीला येणार, ही जगभरातील माध्यमांच्या बातम्यांतून वर्तविली जाणारी शक्यताही मावळली. युक्रेन नाटो सदस्य नसल्याने आम्ही युद्धात प्रत्यक्ष उतरू शकत नाही, असे नाटोने स्पष्ट केले, दुसरीकडे परवापर्यंत रशियाविरुद्ध डरकाळ्या फोडणार्या अमेरिकेनेही युक्रेनला शक्य ती (आर्थिक, आदी) सगळी मदत केली जाईल, पण युद्धात प्रत्यक्ष सहभागाचे तेवढे सोडून बोला, असे 'म्याऊ-म्याऊ' सुरू केले!
युक्रेन राष्ट्राध्यक्ष वोल्दिमीर झेलेन्स्की उद्वेगाने म्हणालेही, आमचे जीव धोक्यात असताना पैशांना आम्ही काय करणार, आम्हाला आमच्यासोबत लढणारे सैन्य हवे. दुसरी मदत नको. अमेरिका, कुठलाही युरोपीयन देश कुणीही युक्रेनमध्ये आपले सैन्य उतरवले नाही. रणांगणात युक्रेनला एकटा पडला आहे.
कोरोनामुळे आर्थिक द़ृष्ट्या अमेरिकेसह सगळेच नाटो सदस्य देश आधीच पोळलेले आहेत. युद्धात सहभाग घेऊन कुणीही आणखी गर्तेत अडकू इच्छित नाही. युक्रेनमध्ये अमेरिकेचा लष्करी तळही नाही. मग अमेरिका युक्रेनची तळी नुसती उचलल्याचे दाखवेल, प्रत्यक्षात उचलणार नाही.
युक्रेनमध्ये तेलाचे साठेही नाहीत. थोडक्यात काय तर अमेरिकेचे आर्थिक हितसंबंधही युक्रेनमध्ये गुंतलेले नाहीत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होताच बायडेन यांनी अफगाणिस्तानातून आपले सैन्य मागे घेतले. सैन्य कारवायांपेक्षा आर्थिक निर्बंधांवर बायडेन यांचा जोर असल्याचेच नेहमी दिसले आहे. थोडक्यात काय तर निर्बंधांना रशियानजे भीक घातलेली नाही. हल्ले सुरूच ठेवले आहेत.
युक्रेनला मदत करू, मदत करू असे आधी सांगणारे अमेरिकेसह सगळे नाटो देश ऐनवेळी मागे हटले आहेत… आणि युक्रेन एकटा पडला आहे.
पॅरिस : फ्रान्सच्या राजधानीतील प्रसिद्ध व्हॅक्स म्युझियम (मेणाच्या पुतळ्यांचे संग्रहालय) 'ग्रेवीन'मधून पुतीन यांचा पुतळा हटविण्यात आला आहे. मंगळवारी या पुतळ्याचे भाग वेगवेगळे करण्यात येऊन ते पुडके अडगळीत टाकून देण्यात आले. 2014 मध्ये रशियाने क्रिमियावर हल्ला केला होता तेव्हा काही लोकांनी या पुतळ्याची तोडफोड केली होती. नंतर तो दुरुस्त करून ठेवण्यात आला होता.
युद्ध युक्रेन आणि रशियामध्ये सुरू आहे; पण त्यालाही इष्टापत्ती समजून पाकिस्तानी नागरिकांनी आपले गुण उधळले आहेत. युक्रेनमध्ये पाकिस्तानी नागरिकांनी पाकिस्तानी विद्यार्थ्यांच्या मदतीने भारतीय विद्यार्थ्यांची लुटालूट केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.
नायजेरियाच्या विद्यार्थ्यांनीही असेच प्रकार केले आहेत. भारतीय विद्यार्थ्यांना केव्हा एकदा युक्रेन सोडतो, असे झाले होते आणि अशा विमनस्क स्थितीत त्यांच्यावर पाकिस्तानी आणि नायजेरियन लुटारूंचे नवे संकट कोसळले.