Latest

UK recession | GDP घसरला; ब्रिटनमध्ये आर्थिक मंदी अधिकृतपणे जाहीर

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : ब्रिटनमध्ये आर्थिक मंदीचे सावट आणखी गडद झाले आहे. जीडीपीमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त घसरण झाल्यामुळे ब्रिटनमध्ये अधिकृतपणे मंदीमध्ये प्रवेश केला असल्याचे उघड झाले आहे. सलग दोन- तीन महिन्यांच्या कालावधीत अर्थव्यवस्था वाढण्याऐवजी आकुंचन पावते, अशावेळी अर्थव्यवस्था मंदीत गर्तेत अडकल्याचे स्पष्ट होते. ब्रिटनमधील सकल देशांतर्गत उत्पादनात (GDP) ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान ०.३ टक्क्यांनी घट झाली आहे, असे ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिक्स (ONS) आकडेवारीतून दिसून आले आहे. (UK recession) याबाबतचे वृत्त Sky News ने दिले आहे.

जीडीपीमधील ही घसरण अपेक्षेपेक्षा जास्त आहे. कारण अर्थशास्त्रज्ञांनी अर्थव्यवस्था ०.१ टक्के संकुचित होण्याचा अंदाज व्यक्त केला होता. पण ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान जीडीपीत ०.३ टक्क्यांची घसरण झाली आहे. तर जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांत ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेने ०.१ टक्के नकारात्मक वाढ नोंदवली होती.

नुकत्याच झालेल्या रॉयटर्सच्या अर्थशास्त्रज्ञांच्या सर्वेक्षणात ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत ०.१ टक्क्यांनी कमी घसरणीचा अंदाज वर्तवला होता. पण जीडीपीत त्याहून अधिक घसरण झाली आहे.

सार्वत्रिक निवडणुकीच्या काही महिने अगोदर ब्रिटनची अर्थव्यवस्था मंदीत अडकल्याचे आकडेवारीवरुन समोर आल्याने पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण होऊ शकते. ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला जवळपास दोन वर्षांपासून खीळ बसली आहे. दरम्यान, २०२४ मध्ये बँक ऑफ इंग्लंडने अर्थव्यवस्थेत किंचित सुधारणेची अपेक्षा व्यक्ती केली आहे. (UK recession)

"या तिमाहीत सर्व मुख्य क्षेत्रांत घसरण झाली आहे. निर्मिती, बांधकाम आणि घाऊक विक्री क्षेत्रांवर वाढीचा सर्वात मोठा ताण आहे. काही प्रमाणात हॉटेल्स आणि वाहन आणि यंत्रसामग्रीच्या भाड्याच्या वाढीमुळे भरपाई झाली आहे," असे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या संचालक लिझ मॅककॉन यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

"संपूर्ण २०२३ मध्ये अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर सपाट झाली." गेल्या वर्षी ब्रिटनच्या जीडीपीत ०.१ टक्क्याने वाढ झाली. जागतिक आर्थिक संकटाच्या काळात २००९ नंतरची ही सर्वात कमी वाढ आहे. २०२० मध्ये कोरोनामुळे अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला. तर २०२२ मध्ये जीडीपी वाढ ४.३ टक्के झाली होती.

हे ही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT