Latest

रायगड: पालकमंत्री उदय सामंत यांच्या बोटीला अपघात

अविनाश सुतार

रायगड; पुढारी वृत्तसेवा: काही दिवसापूर्वी उद्योगमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांना मुंबईला घेऊन जाणारी स्पीड बोट भर समुद्रात बंद पडल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असताना आज (दि.३) सकाळी मुंबईतून अलिबागकडे पालकमंत्र्यांना घेऊन येणाऱ्या स्पीड बोटीच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने बोट जेट्टीला असणाऱ्या सिमेंटच्या खांबावर आदळली. बोटीचा वेग कमी असल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. बोटीतील सर्वजण सुखरूप आहेत.

अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शिवराज्याभिषेक सोहळा नियोजनासंदर्भातील बैठकीसाठी सामंत गेट वे ऑफ इंडियावरून मांडवा येथे स्पीड बोटीने निघाले होते. यावेळी छत्रपती संभाजीराजे त्यांच्या समवेत होते. मांडवा जेट्टीजवळ पोहोचल्यावर चालकाने जेटीवर लावण्यासाठी बोट वळवली. मात्र, यावेळी चालकाचे बोटीवरील नियंत्रण सुटले आणि बोट जेटीच्या खांबाना जाऊन धडकली. सुदैवाने बोटीचा वेग कमी असल्याने यावेळी मोठी दुर्घटना घडली नाही. नंतर बोट चालकाने बोटीवर नियंत्रण मिळवून बोट तरंगत्या तराफ्यावर सुखरूप लावली. तेव्हा सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

सुरवातीला काय घडत आहे याचा अंदाज आम्हाला आला नाही. बोट जाऊन खांबावर आपटली. तेव्हा लक्षात आले हे काही तरी भयंकर घडते आहे. सुदैवाने मोठी दुर्घटना झाली नाही. काही दिवसांपूर्वी याच मार्गावर प्रवास करताना स्पीड बोट वाटेतच बंद पडली होती. यापुढे स्थानिक आमदारांना सोबत घेऊनच स्पीड बोटीने प्रवास करण्याचे मी ठरवले आहे, असे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT