Latest

Cyclone Biparjoy | ‘बिपरजॉय’चा तडाखा, कच्छ, सौराष्ट्रात हाहाकार, २ मृत्यू, २३ जखमी

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : अरबी समुद्रात निर्माण झालेले महाकाय चक्रीवादळ बिपरजॉय (Cyclone Biparjoy) गुरुवारी रात्री गुजरातच्या किनाऱ्यावर धडकले होते. हे 'तीव्र' चक्रीवादळ सौराष्ट्र-कच्छ प्रदेशावर घोंघावत असून शुक्रवारी ते ईशान्येकडे सरकण्याची शक्यता आहे. यामुळे राजस्थानमध्ये मुसळधार पावस पडणार आहे. 'बिपरजॉय' चक्रीवादळ शुक्रवारी सकाळपर्यंत आणखी कमकुवत होऊन संध्याकाळपर्यंत ते 'डिप्रेशन'मध्ये जाण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामान विभागाने (IMD) म्हटले आहे. दरम्यान, चक्रीवादळाने कच्छ आणि सौराष्ट्रात हाहाकार उडाला असून जोरदार वाऱ्यामुळे हजारो झाडे उन्मळून पडली आहेत. काही ठिकाणी मोबाईल टॉवर, वीज आणि ट्रान्समिशनचे खांब कोसळले आहे. कच्छमधील घरांची पडझड झाली आहे. चक्रीवादळाशी संबंधित घटनांमध्ये गुजरातमध्ये दोघांचा मृत्यू झाला असून २३ जण जखमी झाले आहेत.

गुजरातमध्ये 'बिपरजॉय' चक्रीवादळामुळे २३ जण जखमी झाले असून २४ जनावरांचा मृत्यू झाला आहे. चक्रीवादळ धडकण्यापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती एनडीआरएफने दिली आहे.

भावनगर जिल्ह्यात नाल्याला आलेल्या पुरात अडकलेल्या शेळ्यांना वाचवण्याच्या प्रयत्न करत असताना पिता-पुत्राचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, बचावपथकांनी रहदारीसाठी रस्ते मोकळे करण्यास सुरुवात केली आहे आणि चक्रीवादळ शांत झाल्यानंतर वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरू होईल, अशी माहिती गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी चक्रीवादळाचा फटका बसलेल्या सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना नुकसानीचा प्राथमिक अंदाज घेण्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत.

अरबी समुद्रात निर्माण झालेले महाकाय बिपरजॉय चक्रीवादळ अखेर गुरुवारी रात्री गुजरातच्या किनार्‍यावर धडकले. या वादळाने संपूर्ण किनारपट्टीवर हाहाकार माजवला असून शेकडो झाडे, खांब उन्मळून पडले आहेत. कमानी, होर्डिंग्ज पडण्यासोबतच कच्ची बांधकामे असलेल्या इमारतींचेही प्रचंड नुकसान झाले आहे. चक्रीवादळासोबत आलेल्या अतिमुसळधार पावसाने अनेक शहरे व गावे जलमय झाली असून वस्त्यांमध्येही पाणी घुसले आहे.

बिपरजॉय धडकण्याआधी गुरुवारी सकाळपासूनच गुजरातच्या किनारी भागांत जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. तुफानी वार्‍यांसह सुरू असलेल्या मुसळधार पावसाने किनारपट्टीवरील सर्वच जिल्ह्यांना झोडपून काढले. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, विजेचे खांब कोसळले, अनेक घरांवरील पत्रे उडून गेली. चक्रीवादळ किनार्‍यावर धडकण्याची वेळ येण्याआधीच ७० कि.मी. प्रतितास वेगाने वारे वाहत होते व सोबतीला अंदाधुंद पाऊस बरसू लागला.

कच्छ, पोरबंदर, द्वारका, जामनगर, मोरबी, राजकोट, जुनागड, वलसाड या गुजरातच्या भागासह लगतच्या दमण दीवलाही या वादळाचा जोरदार फटका बसला. रात्री ९ वाजेच्या सुमारास जखाऊ बंदरानजीक चक्रीवादळ धडकले आणि त्याचा जमिनीवरील प्रवास सुरू झाला. १२५ कि.मी. प्रतितास वेगाने वारे वाहू लागल्याने वातावरणात भयकारी स्थिती निर्माण झाली. या वादळाची तीव्रता कमी होत उत्तरेकडे राजस्थानपर्यंत पोहोचणार असून वादळाच्या मार्गावर सर्वत्र जोरदार वारे आणि पाऊस सुरू झाला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास चक्रीवादळ (Cyclone Biparjoy) पूर्णपणे किनारपट्टी ओलांडून पुढे सरकले.

१ लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवले

गुरुवारी मध्यान्हीपर्यंत सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेल्या लोकांचा आकडा १ लाखांपर्यंत पोहोचला. एकट्या कच्छ जिल्ह्यातील ४६ हजार ८०० जणांना हलवण्यात आले आहे. त्यात १० हजार बालके, १२०० गरोदर महिला आणि ६ हजार वृद्धांचा समावेश आहे. याशिवाय कच्छ, पोरबंदर, द्वारका, जामनगर, मोरबी, राजकोट, जुनागड, वलसाड येथे एकूण १५५० मदत केंद्रे उभारण्यात आली असून तेथे या सर्वांना आश्रय देण्यात आला आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT