Latest

नाशिकमध्ये डेंग्यूचे आणखी दोन बळी

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- ऑक्टोबरमध्ये नाशिकरोड विभागातील व्यावसायिकाचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची घटना घडलेली असतानाच नाशिकमध्ये डेंग्यूच्या साथीने आणखी दोन बळी घेतल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये नवीन नाशिक विभागातील कामटवाडे परिसरातील पुरुष, तर पंचवटी विभागातील म्हसरूळ परिसरातील ६५ वर्षीय वृद्धेचा समावेश आहे. या दोन्ही मृतांच्या रक्तनमुने तपासणीचा जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे नाशिकमधील डेंग्यूबळींचा आकडा तीनवर गेला आहे.

शहरात डेंग्यूने थैमान घातले आहे. पावसाळा सरल्यानंतरही डेंग्यूचा प्रादुर्भाव कायम राहिल्याने महापालिकेच्या वैद्यकीय विभागाची झोप उडाली आहे. ऑक्टोबर महिन्यात तब्बल १९३ डेंग्यू बाधितांची नोंद झाली होती. या महिन्यात नाशिकरोड विभागातील आनंदनगर परिसरातील व्यावसायिकाचा डेंग्यूने मृत्यू झाल्याने थेट शासनाला दखल घ्यावी लागली. नोव्हेंबर महिन्यात डेंग्यू बाधितांचा आकडा कमी होणे अपेक्षित असताना, उद्रेक अधिकच वाढला. नोव्हेंबरमध्ये डेंग्यूचे विक्रमी २७२ नवे रुग्ण आढळल्याने शहरातील डेंग्यू बाधितांचा आकडा हजाराच्या घरात गेला. या महिन्यात नवीन नाशिक विभागातील डीजीपीनगर-कामटवाडे परिसरातील मध्यमवयीन व्यक्तीला डेंग्यूची लक्षणे आढळल्याने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या रुग्णास काविळीचीही लक्षणे होती. उपचार सुरू असताना या रुग्णाचा मृत्यू झाला. पंचवटीतील म्हसरूळ परिसरातील ६५ वर्षीय वृद्धेसही डेंग्यूची लक्षणे आढळल्याने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या वृद्धेचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दोन्ही रुग्णांचे रक्तनमुने जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. प्रयोगशाळेचा तपासणी अहवाल महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला प्राप्त झाला असून, या दोन्ही रुग्णांचा मृत्यू डेंग्यूमुळे झाल्याचे अहवालातून निष्पन्न झाले आहे.

रुग्ण आढळलेल्या ठिकाणी तपासणी मोहीम

कामटवाडे व म्हसरूळ परिसरातील दोन मृतांना डेंग्यूची लागण झाली होती, हे अहवालातून निष्पन्न झाल्यानंतर महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने रुग्ण राहात असलेल्या परिसरात तपासणी मोहीम राबविली. तापाची लक्षणे आढळलेल्या नागरिकांचे रक्तनमुने तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. मलेरिया विभागातर्फे शहरभर डेंग्यू निर्मूलन मोहीम राबविली जात आहे.

डेंग्यू रुग्णसंख्या

जानेवारी- १७

फेब्रुवारी- २८

मार्च- २८

एप्रिल- ८

मे- ९

जून- १३

जुलै – ३२

ऑगस्ट- ४७

सप्टेंबर- २६१

ऑक्टोबर- १९३

नोव्हेंबर- २७२

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT