Latest

Health dept paper leak : आरोग्य विभागाच्या पेपर फुटीप्रकरणी निवृत्त जवानासह दोघे अटकेत

backup backup

पुणे :  पुढारी वृत्तसेवा

आरोग्य विभागाकडून घेण्यात आलेल्या लेखी परिक्षेच्या पेपर फुटीप्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. त्यामध्ये एका निवृत्त जवानाचा समावेश आहे. (Health dept paper leak)

संदीप रामराव भुतेकर (वय 38, रा. औरंगाबाद) आणि प्रकाश मिसाळ (वय 40, रा. मुंबई) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

त्यांच्याकडे केलेल्या तपासामध्ये या प्रकरणाचे धागेदोरे आरोग्य विभागापर्यंत जात असल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत या प्रकरणात सहा जणांस अटक करण्यात आली आहे.

यापुर्वी या प्रकरणात विजय प्रल्हाद मुर्‍हाडेला (वय 29, रा. नांदी, ता. अंबड, जिल्हा. जालना), अनिल गायकवाड (वय 31) आणि बबन बाजीराव मुंढे (वय 32, रा. बुलढाणा) आणि सुरेश जगताप (वय 28) यांना अटक करण्यात आली असून, हे आरोपी सद्या पोलिस कोठडीत आहेत.

या सर्वांकडे तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात नव्याने अटक केलेला भुतेकर हा निवृत्त जवान आहे. तो 2019 मध्ये लष्करातून निवृत्त झाला आहे. तो औरंगाबाद येथे सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण देणारी नवस्वराज्य नावाने करिअर अकादमी चालवतो. तर मिसाळ हा डॉकयार्ड येथे खलाशी आहे.

या दोघांना एका व्यक्तीने आरोग्य विभागाचा पेपर दिला होता. त्यानंतर दोघांनी त्यांच्याकडील उमेदवारांना सकाळी सहा वाजता बोलवून 92 प्रश्न व त्याची उत्तरे सांगत ती पाठ करून घेतली होती.

मिसाळ याने चाकण परिसरात 30 उमेदवारांना बोलवून उत्तरे सांगितली.

तर भुतेकर याने 23 विद्यार्थ्यांकडून उत्तरे पाठ करून घेतल्याचे समोर आले आहे. मिसाळ याला मदत करणारे दोन एजंट अद्याप फरार आहेत.

Health dept paper leak : पेपर फुटीचे धागेदोरे आरोग्य विभागापर्यंत

या आरोपींकडे तपास केल्यानंतर पेपर फुटीचे (Health dept paper leak) धागेदोरे आरोग्य विभागापर्यंत पोहचत असल्याचे दिसून आहे. त्यादृष्टीने सायबर पोलिसांची पथके तपास करत आहेत.

राज्य आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य विभागातील गट 'ड' या संवर्गातील पदाच्या भरतीसाठी 31 ऑक्टोबर रोजी लेखी परीक्षा घेतली होती. या परिक्षेचे पेपर फोडून त्याची माहिती सोशल मिडीयावर प्रसारित केली होती.

या प्रकारामुळे शासनाची व परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची फसवणूक झाली होती. याप्रकरणी आरोग्य विभागाच्या वतीने मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता कारेगावकर यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

त्यानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

सहा ते सात लाखाचा रेट

पेपर देण्याच्या बदल्यात एका उमेदवाराकडून सहा ते सात लाख रुपये घेण्याचे ठरले होते. त्यापैकी 50 हजार रूपये या आरोपींना मिळणार होते. बाकीची रक्कम त्यांना वरती द्यावी लागणार होती.

उमेदवारांनी अद्यापपर्यंत पैसे दिले नव्हते. मात्र, यादीमध्ये नाव आल्यानंतर त्यांना पैसे द्यावे लागणार होते.

त्यासाठी आरोपींनी उमेदवारांची मूळ शैक्षणिक कागदपत्रे ठेऊन घेतली असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपींकडून उमेदवारांची मूळ कागदपत्रे देखील जप्त केली आहेत.

आरोग्य विभागाच्या पेपर फुटी प्रकरणात सायबर पोलिसांनी आतापर्यंत सहा जणांस अटक केली आहे. सद्या अटक केलेल्या दोन आरोपींकडे चौकशीमध्ये मिळालेल्या माहितीवरून पुढील लिंक पर्यंत पोहचण्याचा प्रयत्न सुरू असून, पोलिस तपास करत आहेत.

– भाग्यश्री नवटके, पोलिस उपायुक्त, सायबर व आर्थिक गुन्हे शाखा

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT