Latest

Gadchiroli : आदिवासी वनवासी नव्हेत; तर मूळनिवासी : शरद पवार

backup backup

भाजपप्रणित संघटनांचे लोक आदिवासींचा 'वनवासी' असा उल्लेख करतात. मात्र, ते मूळनिवासी असून, त्यांच्या प्रगतीसाठी देशाचे धोरण वेगळे असले पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. (Gadchiroli)

आज देसाईगंज येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री खा.प्रफुल्ल पटेल, सुबोध मोहिते, आ.धर्मरावबाबा आत्राम, आ. मनोहर चंद्रिकापुरे, माजी खासदार मधुकर कुकडे, सुनील फुंडे, भाग्यश्री आत्राम उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, एकाच कुटुंबातील ५ व्यक्ती देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान करतात, हा इतिहास केवळ आदिवासी समाजाचाच आहे. परंतु देशात भाजपची सत्ता आल्यापासून ते आदिवासींना गौण दर्जा देत आहेत. जल, जंगल आणि जमिनीचे किंबहुना एकूणच पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करण्याचे काम आदिवासींनी केले आहे. त्यामुळे आदिवासींकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असला पाहिजे. (Gadchiroli)

त्रिपुरा घटनेनंतर राज्याच्या काही भागात हिंसाचार झाला. भाजपची मंडळी तेल ओतून जातीयवाद वाढविण्याचे काम करीत आहेत, अशी टीका पवार यांनी केली. स्वातंत्र्य मिळालं तेव्हा देशाची लोकसंख्या ३५ कोटी आणि शेतकऱ्यांचे प्रमाण ८० टक्के होते.

आज देशाची लोकसंख्या सव्वाशे कोटी झाली असून, शेती कसणाऱ्यांचे प्रमाण ६० टक्कयांवर आले आहे. एकंदरित शेतीवरचा भार अडीच टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे शेती कसणाऱ्यांना मदत केली पाहिजे, असे पवार म्हणाले. (Gadchiroli)

याप्रसंगी भाजपचे जिल्हा परिषदेतील गटनेते नाना नाकाडे यांच्यासह भाजपचे चार माजी तालुकाध्यक्ष व काही सरपंचांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT