Latest

Dhule : सातबाराच्या मागणीसाठी 80 किलोमीटर पायपीट करून आदिवासी शेतकऱ्यांचा मोर्चा

गणेश सोनवणे

धुळे पुढारी वृत्तसेवा : एकच नारा सातबारा हमारा, अशा घोषणा देत आज किसान सभा आणि बिरसा मुंडा फायटर्सने काढलेला शेतकरी मोर्चा धुळ्यात ( Dhule ) धडकला. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत अशाच पद्धतीने आंदोलन करणार असल्याची भूमिका यावेळी मोर्चेकऱ्यांनी व्यक्त केली आहे. तब्बल 80 किलोमीटरची पायपीट करीत हा मोर्चा आज धुळ्यात पोहोचला.

शिरपूर तालुक्यातील सांगवी येथून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली. हा मोर्चा आज सकाळी धुळ्यात (Dhule) पोहोचला. यावेळी श्री एकवीरा देवीचे दर्शन करून मोठ्या पुलावरून हा मोर्चा थेट महात्मा गांधी पुतळा मार्गे आग्रा रोड वरून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चाचे नेतृत्व किसान सभेचे जिल्हाध्यक्ष हिरालाल परदेशी, प्राध्यापक राजू देसले, ॲड मदन परदेशी, विलास पावरा, अर्जुन खोडे, साहेबराव पाटील, वसंत पाटील यांच्यासह अनेकांनी केले.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला मोर्चेकर्‍यांनी अभिवादन केल्यानंतर शहरातील प्रमुख रस्त्यांवरून हा मोर्चा नेण्यात आला. यावेळी जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या व्यथा स्पष्ट करण्यात आल्या. गेल्या 14 वर्षापासून वन हक्क कायदा तयार करण्यात आला. मात्र अद्यापही जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना सातबारा शासनाने दिलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज, बँकेचे कर्ज तसेच शेतकरी सन्मान योजने सारखे अनुदान मिळण्यासाठी अडचणी येतात. (Dhule)

गोपीनाथराव मुंडे अपघात विमा योजनेचा देखील लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही. शेती क्षेत्राची मोजणी होऊन सातबारा मिळत नाही, तोपर्यंत वनहक्क प्रमाणेच वन जमीन धारक शेतकऱ्यांना सातबारा उतार्‍यावर मिळणारे इतर लाभ देण्यात यावे अशी प्रमुख मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली. शेतकऱ्यांच्या या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत अशाच पद्धतीचे आंदोलन केले जाणार असल्याची भूमिका यावेळेस मोर्चेकर्‍यांनी मांडली आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT