Latest

Travel Destination : कपलसाठी फिरायला बेस्ट आहेत ‘ही’ ५ ठिकाणे

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिवाळी आली की सुट्ट्यांचा हंगाम सुरू होतो. दसरा दिवाळी संपली की, लोक ट्रीपचे प्लॅनिंग करतात. (Travel Destination) यामध्ये कपल्सदेखील मागे नाहीत. कपल्सना वेध लागतात ते टूरचे. फार गोंधळ, गोंगाट नसलेली जागा कपल शोधतात, असे मिश्किलपणे म्हणायला हरकत नाही. त्यांना एकांत हवा असतो. आपण महाराष्ट्रातील काही ठिकाणे पाहिल्यास जिथे पर्यटक अगदी तुरळक असतात. तर काही ठिकाणे गर्दीची असतात. पण, कपल्ससाठी काही बेस्ट ठिकाणे आपल्याकडे आहेत. ही ठिकाणे तुम्ही एकदा फिरून याच! (Travel Destination)

महाराष्ट्रातील एकांत असणारी बेस्ट ठिकाणे –

आंबोळगड –

तुम्हाला निवांतपणा, शांतता हवी असेल तर आंबोळगडच्या बीचवर जा. येथे तुम्हाला फारशी वर्दळ दिसणार नाही. पण, समुद्रालगत बरीच वस्ती आहे. काही हॉटेल्स आणि रूम्सदेखील उपलब्ध आहेत. येथे राहण्याची आणि खाण्याची सोयदेखील उत्तम आहे. मासे, सोलकडी, अंडाकरी, चिकनकरी असे घरगुती पध्दतीच्या जेवणाची चवदेखील येथे चाखता येते.

दोन दिवसांत तुम्हाला आंबोळगडाचा प्रवास करून परत येता येते. आंबोळगड – कोल्हापूर-शाहूवाडी मार्गे रत्नागिरी- आडीवरे-नाटे-आंबोळगड तसेच कोल्हापूर -राजापूर-नाटे-शेडभू-आंबोळगड असे जाता येईल. आंबोळगडचा समुद्रकिनारा, यशवंतगड, गगनगिरी महाराजांचे आश्रम, आंबोळगडचा किल्ला, मुसाकाजी बंदर अशी विविध ठिकाणे तुम्हाला पाहता येईल, येथील शिमगोत्सव ही पारंपरिक आणि मोठ्या उत्साहात असतो. विविध समुद्रकिनारी तुम्ही अनुभवलेल्या नेहमीच्या ट्रीपपेक्षा आंबोळगडचा अनुभव तुमच्यासाठी अविस्मरणीय ठरेल.

वेंगुर्ला-चिवला –

तुम्ही रत्नागिरी, साखरपा, गणपतीपुळे, आरेवारे, दापोलीला पर्यटनाला गेला असाल. तसेच तारकर्ली, सिंधुदुर्ग, देवबाग वगैरे ट्रीप देखील केली असेल. पण, वेंगुर्ला-चिवला बीचवर गेलाय का? इतर समुद्र किनाऱ्यांप्रमाणे हे बीच तसे फारसे वर्दळीचे नाही. नीरव शांतता येथे अनुभवायला मिळेल. तसेच अनेक रेस्टॉरंट, हॉटेल्स आणि कॉटेजेस राहण्यासाठी उत्तम आहेत.

येथे ताजे सुरमई, बोंबील, कोळींबीदेखील ताव मारता येतो. मच्छीमार्केटमध्ये नानाविध प्रकारचे माशांचा होणार लिलाव डोळ्यांनी पाहता येतो. स्वच्छ समुद्र किनारे आणि रम्य संध्याकाळी सोनेरी वाळूत बसून तुम्हाला चहा पिण्याचा आनंद घेता येतो. जवळचं वेंगुर्ला बंदर, लाईट हाऊस, मानसीश्वर मंदिर, पाहण्यासारखी ठिकाणे आहेत. येथून जवळच शिरोड्याला जाण्यासाठी मार्ग आहे. येतून मोचेबीड आणि सागरेश्वर बीचलादेखील जाता येते.

लोणार –

लोणार हे नाव औरंगाबाद जिल्ह्यातील एका तलावावरून पडले आहे. पृथ्वीवर उल्का पडल्यावर हा तलाव तयार झाला. हा तलाव पर्यटकांना खूप आवडतो. जाताना औरंगाबादचं पर्यटनदेखील तुम्हाला करता येईल. त्याशिवाय दैत्यसुदन मंदिर, कमलजा देवी मंदिर , गोमुख मंदिर येथेही जाता येतं.

इगतपुरी –

हे ठिकाण समुद्रसपाटीपासून उंच आहे. त्यामुळे येथे वर्षभर चांगले वातावरण असून आल्हाददायक हवामान असते. पावसाळ्यात जाणे म्हणजे स्वर्गाहून सुख. इगतपुरीत हिरवळ, जंगल आणि जलसंपदा आहे. निसर्गाची देणगी म्हणजे काय असते, हे याठिकाणी पाहायला मिळते. भातसा नदीचे पात्र डोळ्यांना सुखावणारं आहे. आर्थर तलावदेखील तुम्हाला पाहता येईल. अमृतेश्वर मंदिर, धम्मगिरी विपश्यना केंद्र, कळसुबाई शिखर, गिरीसागर फॉल्स, कॅमल व्हॅली, त्रिनगलवाडी फोर्ट, भावली धरण, थाल घाट, म्यानमार गेट, भावली डॅम, अशोका फॉल्स, घाटनदेवी माता मंदिर ही ठिकाणे इगतपुरीचे आकर्षण आहे.

पाचगणी –

महाराष्ट्राचे हिल स्टेशन म्हणून पाचगणीला म्हटले जाते. थंड ठिकाण आणि प्रमुख पर्यटन स्थळांच्या यादीत पाचगणीचा समावेश होतो. सह्याद्रीच्या रांगांमधील पाच टेकड्यांमुळे या स्थळाला पाचगणी असे नाव दिले जाते. येथे कमलगडचा किल्ला आणि धाम धरण तलाव पाहण खूप मनमोहक आहे. नयनरम्य दृश्य पाहून तुम्हीही सुखावून जाल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT