Latest

पुणे-नाशिक मार्गावर दुसऱ्यांदा टोलवाढ; चाळकवाडी टोलकानाक्यावर २५ रुपयांनी वाढ

अमृता चौगुले

आळेफाटा : पुढारी वृत्तसेवा

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चाळकवाडी आणि हिवरगाव टोल नाक्यावर आकारण्यात येणाऱ्या टोलमध्ये २०२२ या वर्षात दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. चाळकवाडी टोल नाक्यावर हलक्या वाहनांसाठी तब्बल २५ रुपयांनी वाढ केली असून, सोमवारी ६ जून मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू होणार आहे.

राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यावर दोन वर्षांनी टोलवाढ करण्यात येते. चाळकवाडी टोलनाका २०१७ मध्ये बंद पाडण्यात आला होता. तो गेल्या आर्थिक वर्षांत पुन्हा सुरू करण्यात आला. त्यानंतर एप्रिल महिन्यात चाळकवाडी आणि हिवरगाव येथील टोलनाक्यांवर आकारण्यात येणाऱ्या टोलमध्ये दि. १ एप्रिल २०२२ रोजी ५ रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्यानुसार कार आणि हलक्या वाहनांना एकेरी प्रवासासाठी ५० रुपये आणि दुहेरी प्रवासासाठी ८० रुपये टोल आकारला जात होता.

आता दोन महिन्यांनंतरच पुन्हा चाळकवाडी टोलनाक्यावरील टोल २५ रुपयांनी वाढविला आहे. त्यानुसार आता कार व हलक्या वाहनांना एकेरी प्रवासासाठी ७५ आणि दुहेरी प्रवासासाठी ११० रुपये टोल आकारण्यात येणार आहे. हलकी व्यावसायिक वाहने, मिनी बससाठी एकेरीचा टोल ११५ आणि दुहेरी प्रवासासाठी १७५ रुपये करण्यात आला आहे. तर, दोन एक्सल ट्रक व बसचा एकेरी वाहतुकीचा टोल २४५ आणि दुहेरी प्रवासासाठी ३७० रुपये राहणार आहे. तीन एक्सल मालवाहतूक वाहनांना एकेरी वाहतुकीचा टोल २७० आणि दुहेरी प्रवासासाठी ४०५ रुपये, चार ते सहा एक्सल मालवाहतूक वाहनांना एकेरी वाहतुकीचा टोल ३८५ आणि दुहेरी प्रवासासाठी ५८० रुपये, सात व त्यापेक्षा अधिकच्या एक्सल मालवाहतूक वाहनांना एकेरी वाहतुकीचा टोल ४७० आणि दुहेरी प्रवासासाठी ७०५ रुपये राहणार आहे.

हिवरगाव पावसा टोलनाक्यावर कार आणि हलक्या खासगी वाहनांच्या एकेरी प्रवासासाठी ९० रुपये टोल होता. तो आता १०० रुपये करण्यात आला आहे. दुहेरी प्रवासाठी १४० रुपये टोल द्यावा लागणार आहे. हलकी व्यावसायिक वाहने, मिनी बससाठी १६५ रुपये, बस आणि ट्रकसाठी ३४५ रुपये टोल द्यावा लागेल. ही टोलवाढ सोमवारी मध्यरात्रीपासून लागू होणार आहे, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.

टोल दरवाढीचे फलक प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी फाडले

पुणे-नाशिक महामार्गावरील चाळकवाडी आणि हिवरगाव टोल नाक्यांवरील वसुलीचा ठेका नवीन कंपनीने घेतला आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून नवीन दर लागून होणार आहे. मात्र त्यापूर्वी टोलनाक्यावर अधिकच्या दाराचे फलक लावण्याचे काम सुरु होते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी टोलनाक्याला भेट दिली असता त्यानी अधिकच्या दराचे फलक फाडून टाकले. रात्री बारानंतर अधिकच्या दाराचे फलक लावण्याच्या सूचना केल्या.

चाळकवाडी टोलनाक्यावर दोन महिन्यात ३० रुपयाने टोल वाढला आहे. एकीकडे महागाई वाढत आहे. डिझेल, पेट्रोलचे दर वाढते आहे. त्यात पुन्हा टोल वाढला. सामान्य माणसाचा विचार करून सरकारने टोलवाढ मागे घ्यावी.
– बाळासाहेब कुऱ्हाडे, प्रवाशी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT