धाराशिव/परंडा पुढारी वृत्तसेवा: चांगले काम करुनही मला 2019 च्या मंत्रीमंडळात तत्कालीन पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मला स्थान दिले नाही. त्यामुळे संतप्त होऊन मी शिवसेनेतून पहिली बंडखोरी करीत दवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने उस्मानाबाद जिल्हा परिषदेत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. पुढे दोन वर्षे शिवसेनेतील आमदारांचे कौन्सिलिंग करण्यासाठी 100 ते 150 बैठका घेतल्या. सोबत देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदेंचीही साथ होती. त्यामुळेच हे सरकार पाडण्यात यश आले, असा गौप्यस्फोट आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केला.
जिल्ह्यातील परंडा येथे आयोजित कुस्ती स्पर्धेत त्यांनी हा गौप्यस्फोट केला. ते म्हणाले, की 2019 च्या निवडणुकीत जनतेने भाजप-शिवसेना युतीला कौल दिला असतानाही शरद पवार यांनी मिठाचा खडा टाकला आणि पक्षप्रमुख ठाकरे यांनी महाविकास आघाडीसोबत सत्ता स्थापन केली. त्या सरकारमध्येही मला स्थान दिले नाही. त्यामुळे मी मातोश्रीवर जाऊन 'त्यांना' सांगून आलो की मी आता पुन्हा या मातोश्रीची पायरी चढणार नाही. 30 डिसेंबरला मंत्रीमंडळ विस्तार झाला. त्यातून मला लांब ठेवण्यात आले. त्यामुळे संतप्त होऊन व मी फडणवीस यांच्या आदेशाने 3 जानेवारीला बंडखोरी करीत भाजपच्या साथीने उस्मानाबाद जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली. त्यानंतर सलग दोन वर्षे हे सरकार पाडण्यासाठी कामाला लागलो. देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांच्यासोबत सतत बैठका झाल्या. जवळपास 100 ते 150 बैठका झाल्या.
या काळात विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांचे कौन्सिलिंग आम्ही करीत होतो. मंत्री तानाजी सावंत यांच्या या वक्तव्याने सरकार पाडण्याचे कटकारस्थान दोन वर्षांपासून सुरु होते हेही स्पष्ट झाले आहे. तसेच हे सरकार पाडण्यात आपला कसलाही सहभाग नसल्याचे फडणवीस सांगत असले तरी त्यांचेही प्रयत्न उघड झाले आहेत.
हेही वाचा