पुढारी डेस्क : महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यांतील पशुधनांमध्ये 'लंपी स्किन डिसीज'चा (Lumpy skin disease) संसर्ग पसरला आहे. यामुळे ४३ जनावरांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने राज्यभरात जनावारांचे लसीकरण मोहीम सुरू केली आहे. याचा अद्याप राज्यातील दूध पुरवठ्यावर परिणाम झालेला नाही. राज्य पशुसंवर्धन विभागाने राज्यातील सर्व जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांना जनावरांमधील त्वचेच्या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरणाला गती देण्याचे निर्देश दिले आहेत. या आजाराने राज्यातील आतापर्यंत ४३ जनावरांचा बळी घेतला आहे, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली.
संक्रमित क्षेत्राच्या पाच किलोमीटरच्या परिघातातील १,७५५ गावांमधील एकूण ५,५१,१२० पशुधनांना लसीकरण करण्यात आले आहे. बाधित गावांमधील एकूण २,६६४ संक्रमित जनावरांपैकी १,५२० जनावरे उपचारानंतर बरी झाले आहेत, असे पशुसंवर्धन विभागाने म्हटले आहे. पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी म्हटले आहे की, राज्यात या आजाराचा झपाट्याने फैलाव होत असून त्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याची गरज आहे.
"महाराष्ट्रातील Lumpy skin disease मुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी प्रादुर्भाव क्षेत्रातील पाच किमीच्या परिघातातील गायींना लसीकरण करण्यासाठी १० लाख लसीचे डोस प्राप्त झाले आहेत," असे म्हटले आहे. "लसीकरण जलद गतीने करावे आणि रोग नियंत्रणात आणण्यासाठी सतत प्रयत्न करावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत," असे पशुसंवर्धन विभागाने नमूद केले आहे.
या संसर्गजन्य आजाराला रोखण्यासाठी उपयुक्त असलेल्या लसी आणि औषधांच्या खरेदीसाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून एक कोटी रुपये उपलब्ध करून द्यावेत, असेही त्यात म्हटले आहे. "या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी खासगी पशुधन पर्यवेक्षकांच्या सहकार्याने लसीकरण मोहीम राबवली जावी आणि त्यांच्या सेवा मोबदल्याच्या आधारावर घेतल्या जाव्यात. पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे ताबडतोब कंत्राटी पद्धतीवर भरावीत" असेही प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
महाराष्ट्र सरकारने या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण राज्य आधीच नियंत्रित क्षेत्र (controlled area) म्हणून घोषित केले आहे आणि जनावारांशी संबंधित बाजार, शर्यती आणि प्रदर्शने आयोजित करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
जनावरांच्या अंगावर १० ते २० मि.मी. व्यासाच्या गाठी येतात. सुरुवातीस भरपूर ताप, डोळ्यातून नाकातून चिकट स्राव, चारा पाणी खाणे कमी अथवा बंद, दूध उत्पादन कमी, काही जनावरात पायावर सूज येणे व लंगडणे आदी लक्षणे दिसून येतात.
बाधित जनावरे निरोगी जनावरांपासून वेगळी ठेवणे, कोणत्याही संभाव्य रोगी जनावरास निरोगी जनावरांच्या कळपात प्रवेशास बंदी करणे, रोग प्रादुर्भाव झालेल्या गावातील बाधित व निरोगी जनावरांना चराऊ कुरणांमध्ये एकत्रित सोडण्यास मनाई करणे, डास, गोचिड, तत्सम किड्यांचा बंदोबस्त करणे, तसेच निरोगी जनावरांच्या अंगावर किडे न चावण्यासाठी औषध लावणे व गोठ्यामध्ये यासाठीच्या औषधांची फवारणी करणे, रोग प्रादुर्भाव क्षेत्रातील जनावरांना रोग प्रादुर्भाव नसलेल्या ठिकाणी तसेच स्थानिक बाजारामध्ये नेण्यास प्रतिबंध करणे.
लंपी या रोगाचा संसर्ग कॅप्रीपॉक्स विषाणूमुळे होतो. हा विषाणू शेळ्या व मेढ्यांमधील देवी रोगाच्या विषाणूशी संबंधित आहे.
असा होतोय प्रसार डास, चावणार्या माशा, गोचिड, चिलटे, बाधित जनावरांचा स्पर्श, दूषित चारा-पाणी.
हे ही वाचा :