Latest

अंमली पदार्थाची तस्करी करणारे त्रिकूट जेरबंद; गांजा कोयते, रोकड, जप्त

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने शहरातील भारती विद्यापीठ व सिंहगड रोड परिसरात छापा टाकून तिघा गांजा तस्करांना अटक केली. त्यांच्याकडून साडेचार लाख रुपये किंमतीचा 23 किलो गांजा, दोन कोयते, मोबाईल, रोकड व इलेक्ट्रीक वजन काटा जप्त करण्यात आला आहे.

अमित उर्फ बॉब प्रभाकर कुमावत (वय.32,रा. समर्थनगर हिंगणे), सनी विजय भोसले (वय.24), साई गिता कोताकोंडा (वय.19,रा. दोघे रा. जाधवनगर वडगाव बुद्रुक, सिंहगड रोड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी तिघांविरुद्ध भारती विद्यापीठ व सिंहगड रोड पोलिस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तिघेही नगरचे

तिघेही आरोपी मुळचे अहमदनगर जिल्ह्यातील आहेत. तिघे एकमेकांच्या परिचयाचे आहेत. शहरातील कात्रज, सिंहगड रोड परिसातील नामांकित कॉलेज परिसरात हे गांजाची विक्री करत होते. प्रामुख्याने वसतिगृहावर राहणारे विद्यार्थी या तिघांचे ग्राहक असल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड हे भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर असताना पोलिस कर्मचारी विशाल शिंदे यांना अमित उर्फ बॉब हा त्याच्या राहत्या घरातून गांजाची विक्री करत असल्याची माहिती मिळली. त्यानुसार पथकाने छापा टाकला असता, बॉब याच्या घरात 4 लाख 23 हजार रुपये किंमतीचा 21 किलो गांजा मिळून आला.

दुसरी कारवाई सिंहगड रोड येथील जाधवनगर परिसरात करण्यात आली आहे. येथील सिद्धेश्वर हॉटेल समोरील रोडवर सनी व साई हे दोघे संशयास्पदरित्या हालचाल करत असाताना गस्तीवरील पथकाला दिसले. दोघांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली त्यावेळी त्यांच्याकडे 31 हजार रुपये किंमतीचा गांजा, दोन मोबाईल व रोकड आणि कोयते मिळून आले. दोघांच्या विरुद्ध सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कामगिरी पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे, पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी विशाल शिंदे, विशाल दळवी, मारुती पारधी, नितेश जाधव, योगेश मोहिते यांच्या पथकाने केली.

SCROLL FOR NEXT