Latest

अकरावी प्रवेशासाठी कुणी विद्यार्थी देता का?

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : अकरावी प्रवेशाच्या तीन नियमित फेर्‍या पूर्ण होऊन सोमवारपासून (दि.16) विशेष फेरी सुरू होत आहे. परंतु तीन नियमित फेर्‍या होऊनही केवळ 44 हजार 206 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. तर विशेष फेरीसाठी अजूनही 70 हजार 344 जागा रिक्त आहेत. त्यामुळे 'अकरावी प्रवेशासाठी कुणी विद्यार्थी देता का विद्यार्थी?' अशी म्हणण्याची वेळ महाविद्यालयांवर आल्याचे दिसत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात अकरावी प्रवेशासाठी 325 महाविद्यालयांत 95 हजार 835 'कॅप'च्या तसेच 18 हजार 715 कोट्यातील प्रवेशाच्या अशा एकूण 1 लाख 14 हजार 550 जागा उपलब्ध आहेत.

त्यापैकी आतापर्यंत झालेल्या तीन फेर्‍यांमध्ये कोटा आणि कॅप मिळून 44 हजार 206 जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. तर प्रवेशासाठी 70 हजार 344 जागा उपलब्ध आहेत. अकरावी प्रवेशासाठी यंदा 8 जूनपासून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. तर पहिली यादी 19 जूनला जाहीर झाली. तर आतापर्यंत तीन फेर्‍या पूर्ण झाल्या आहेत. जवळपास सव्वा महिना उलटूनही यंदा अकरावीसाठी अपेक्षित प्रवेश झालेले नाहीत. नामांकित महाविद्यालयांचे कटऑफ तिसर्‍या फेरीनंतरही 85 ते 90 टक्क्यांदरम्यान राहिल्यामुळे विद्यार्थ्यांना नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळत नाही. तर दुसरीकडे अन्य महाविद्यालयांमध्ये जागा रिक्त असूनही प्रवेशासाठी विद्यार्थीच फिरकत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे यंदा 60 हजार विद्यार्थी तरी अकरावीला प्रवेश घेणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

गावाजवळच अ‍ॅडमिशन मिळाल्यास बरे
ग्रामीण भागातील अनेक महाविद्यालयांकडून 'तुम्ही फक्त प्रवेश घ्या, उपस्थिती नसली तरी चालेल', अशी भूमिका घेऊन विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे. गावाजवळच असलेली महाविद्यालये आणि हजर न राहण्याची मुभा, शेतात किंवा गावातच काम करून केवळ परीक्षेला जायचे असल्यामुळे अनेक विद्यार्थी सध्या गावाजवळ असलेल्या महाविद्यालयात प्रवेश घेत आहेत. त्यामुळे अकरावी प्रवेशाला गावाकडून येणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या घटलेली दिसून येत आहे.

कला शाखेतील शिक्षक अतिरिक्त होण्याचा धोका
दहावीनंतर विद्यार्थ्यांचा कला शाखेकडे ओढा होता.परंतु मागील पाच वर्षांचा ट्रेंड पाहता बहुतांश विद्यार्थी गुण कमी-जास्त असले, तरी विज्ञान शाखेत आणि नंतर वाणिज्य शाखेत प्रवेश घेताना दिसत आहेत. त्यातच दहावीनंतर सर्वच मुले कला,वाणिज्य, विज्ञान शाखेचे शिक्षण घेतात असे नाही. आयटीआय, तंत्रशिक्षण, नर्सिंग तसेच अन्य अभ्यासक्रमांकडे सध्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी जात आहेत. परिणामी, अकरावीच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त राहत असून, कला शाखेतील शिक्षक अतिरिक्त होण्याचा धोका वाढला आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT