Latest

अवकाळी काही पिकांसाठी हसू तर काही पिकांसाठी आंसू !

अमृता चौगुले

भामा आसखेड : पुढारी वृत्तसेवा :  अवकाळी पावसाने खरीप हंगामातील काढणीस आलेल्या भात पिकाला झटका बसला आणि भात खाचरांत पेरणी केलेल्या पिकांचे नुकसान झाले, तर रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा आणि गहू पिकाला जीवदान मिळाल्याने हा पाऊस म्हणजे आनंद, दु:खाचा खेळ झाल्याची अवस्था शेतकर्‍यांची झाली आहे. रविवारी (दि. 26) सायंकाळनंतर खेड तालुक्याच्या अनेक भागांत अवकाळी मुसळधार पाऊस झाला. पाऊस येण्याची शक्यता धरून भात उत्पादक शेतकर्‍यांनी शेतातील काढणीस आलेल्या पिकाच्या काढणीची घाई केली. काही शेतकर्‍यांनी भाताची झोडणी करून पेंढा शेतात ठेवला. रविवारी पाऊस अचानक सुरू झाला. भात काढून शेतात ठेवलेले पीक भिजल्याने मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. भाताच्या पेंढ्यांचेही नुकसान झाले. अनेक ठिकाणी भात पिकात पाणी साचल्याने हातातोंडांशी आलेल्या पिकाचे नुकसान झाल्याने अनेक शेतकर्‍यांनी पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाईची मागणी केली. आंबोली परिसरातील अनेक गावांत मुसळधार पाऊस झाल्याने भात खाचरे तुडुंब भरली आहेत. भात पिकानंतर मसुरी, वाटाणा पेरणी केलेल्या पिकांचे त्यामुळे नुकसान होणार आहे.

एकीकडे अवकाळी पावसाने भात पिकाला झटका बसला, तर दुसरीकडे रब्बी हंगामात पेरलेल्या गहू, ज्वारी, हरभरा या पिकांना या पावसाने दिलासा मिळाल्याने त्या शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ज्या शेतकर्‍यांकडे पाणी देण्याची सोय आहे त्यांनी पाणी दिले होते. परंतु, ज्यांना पाणी नव्हते ते शेतकरी पावसाची वाट पाहत असताना अचानक पाऊस झाल्याने समाधानी आहेत.

अजूनही पावसाची शक्यता
आंबोली, पाईट, शिरोली, चांदूस, संतोषनगर, पिंपरी, कोरेगाव, कुरकुंडी, करंजविहिरे, गोणवडी, अहिरे, चाकण एमआयडीसी भागातील गावे, शिवे, तळवडे, राक्षेवाडी, होलेवाडी, चांडोली आदी गावांच्या परिसरात जोरदार पाऊस झाला. तालुक्यात अजूनही ढगाळ वातावरण असल्याने पावसाची शक्यता आहे. सोयाबीन काढणीनंतर गहू, हरभरा या पिकांना झालेला पाऊस जीवदान देणारा समाधानकारक झाल्याचे वडगाव पाटोळे येथील शेतकरी किसन नेहेरे यांनी सांगितले.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT