Latest

राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा दावा

अंजली राऊत

जळगाव: पुढारी वृत्तसेवा

सध्याचे सरकार हे निवडणुकांना घाबरत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थासह सर्व निवडणुका जास्तीत जास्त पुढे कशा ढकलता येतील, याचाच प्रयत्न सुरू आहे. मात्र राज्यातील सत्तासंघर्षाबाबत सुरु असलेल्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाचा योग्य निकाल आल्यास राज्य सरकार कोसळू शकते, परंतु मध्यावधी निवडणुकाऐवजी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता अधिक आहे, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी पाचोरा येथे पत्रकार परिषदेत हा मोठा दावा केला आहे. राज्यातील सद्याच्या परिस्थितीबाबत बोलतांना जयंत पाटील यांनी शिवसेनेसह भाजपवर टीका केली. ते म्हणाले, राज्यात शिवसेनेतून बाहेर पडलेल्या शिंदे गटाला कोणतीही किमंत राहिली नाही. मात्र त्यासोबत आता भारतीय जनता पक्षाची किंमत कमी झाली आहे. असंगाशी संग केल्यावर काय होते ते आता भाजपला दिसून आले आहे. आगामी निवडणूकीत जनताही त्यांना दाखवून देईल.

एकनाथ शिंदे भाजपच्या प्रभावाखाली

जयंत पाटील यांनी मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांचाही समाचार घेतला. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या मुंबईतील पत्रकार परिषदेचे उदाहरण दिले. जयंत पाटील म्हणाले, "एकनाथ शिंदे किती प्रभावाखाली काम करीत आहेत, हे जनतेला दिसून आले आहे. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असले तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच खऱ्या अर्थाने मुख्यमंत्रीपदाचे काम करीत आहेत हेच जनतेला दिसून आले आहे."

महाविकास आघाडी म्हणूनच लढणार

यावेळी पाटील यांनी राज्यातील आगामी निवडणुकांबाबत महाविकास आघाडीचे धोरणही स्पष्ट केले. पाटील म्हणाले, राज्यातील आगामी बाजार समिती तसेच पालिका, महापालिका, विधानसभा व लोकसभा निवडणुका काँग्रेस, राष्टवादी काँग्रेस, शिवसेना महाविकास आघाडी म्हणूनच लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपकडे राष्ट्रवादीशिवाय पर्यायच नाही

जळगाव येथे आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयातील बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधतांना जयंत पाटील म्हणाले की, शिंदे गटामुळे भाजपाला किंमत राहिलेली नाही. जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय पवार यांना फोडून भाजप-शिवसेना शिंदे गटाने अध्यक्षपद बहाल केले. त्यावर बोलतांना जयंत पाटील म्हणाले, भारतीय जनता पक्षाला स्वबळावर विरोधकांना पराभूत करण्याचे सामर्थ्य नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव करण्यासाठी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा माणूस शोधावा लागतो. त्या शिवाय त्यांना कोणताही पर्याय नसतो.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT