Latest

अधीर रंजन चौधरी यांच्या निलंबनाच्या मुद्यावरुन लोकसभेत प्रचंड गदारोळ

मोनिका क्षीरसागर

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: सदनात वारंवार चुकीचे वर्तन केल्याचा ठपका ठेवत काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांचे लोकसभेतून काल (दि.१० ऑगस्ट) निलंबन करण्यात आले होते. या मुद्याचे तीव्र पडसाद लोकसभेत शुक्रवारी (दि.११) उमटले. काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी या विषयावर सरकारला जाब विचारत जोरदार राडेबाजी केली. गोंधळामुळे प्रश्नोत्तर तसेच शून्य प्रहराचे कामकाज वाया गेले.

लोकसभेत सकाळी अकरा वाजता कामकाजाला सुरुवात झाल्या झाल्या काॅंग्रेसचे सदस्य गौरव गोगोई यांनी चौधरी यांच्या निलंबनाचा मुद्दा उपस्थित केला. चौधरी यांनी दरवेळी कामकाजात सहकार्य केले आहे. त्यामुळे त्यांचे निलंबन अयोग्य असल्याचा युक्तिवाद गोगोई व काँग्रेसच्या अन्य सदस्यांनी केला. अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्याकडे दुर्लक्ष करीत प्रश्नोत्तराचा तास पुढे रेटण्याचा प्रयत्न केला. मात्र गोंधळ वाढत गेल्याने अध्यक्षांनी कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत तहकूब केले.

चौधरी यांचे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे पाठविण्यात आले आहे. जोवर यासंदर्भातला अहवाल येत नाही, तोवर त्यांचे निलंबन कायम राहील, असे बिर्ला यांनी अविश्वास प्रस्तावावरील चर्चा संपल्यानंतर स्पष्ट केले होते. चौधरी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी मांडला होता. आर्थिक घोटाळा करुन विदेशात पळून गेलेल्या नीरव मोदी याच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना चौधरी यांनी केली होती. त्यानंतर सदनात एकच गदारोळ उडाला होता.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT