पुढारी ऑनलाईन डेस्क: राज्यात युतीचे सरकार असताना खेकड्यांमुळे धरण फुटले होते. अशा खेकड्यांच्या हाती कारभार गेला आहे का? रूग्णालयात मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना नुसती मदत देऊन चालणार आहे का? राज्य सरकार यमाचा दरबार झाला आहे. या सरकारकडे जाहिराती करायला, गुवाहाटीला जायला, गोव्यात जावून नाचायला पैसे आहेत. पण औषधांसाठी पैसे नाहीत. रूग्णमृत्यूच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची निःपक्ष चौकशी केली पाहिजे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. मातोश्रीवर आज (दि.६) आयोजित पत्रकार परिषदेत ते (Uddhav Thackeray) बोलत होते.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले की, कोविड काळात तेच डॉक्टर, डीन, नर्स आणि वॉर्ड बॉय होते. त्यांनी जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा केली. महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे, जिथे दुर्गम भागात ड्रोनद्वारे औषधे पोहोचवली जात होती. गेल्या काही दिवसांपासून ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि नांदेड येथून रूग्णांच्या मृत्यूच्या बातम्या येत आहेत. अजूनही काही ठिकाणांहून अशाच बातम्या येत आहेत.याला जबाबदार कोण? या कठीण काळात मुख्यमंत्री कुठे आहेत?, रूग्णालयात जाऊन याचे कारण शोधण्याची जबाबदारी सीएम आणि उपमुख्यमंत्र्यांची होती, असे ठाकरे म्हणाले.
निविदा प्रक्रियेशिवाय औषधांची खरेदी केली जात असेल, तर त्यात भ्रष्टाचार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुम्हीच त्यासाठी दारे खुली करुन देत आहात. जिथे औषधे खरेदी केलेली नाही किंवा पोहोचलेली नाहीत. तिथे कोणाचे दलाल बसले आहेत, याची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणीही ठाकरे यांनी यावेळी केली.
नांदेडच्या शासकीय रूग्णालयामध्ये मागील ८ दिवसांत ८९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ३८ बालकांचा समावेश आहे. याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. ठाकरे यांनी या घटनेवरून संताप व्यक्त करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा