Latest

“…त्‍यांची शिकवण देशद्रोही म्‍हणून बॉम्‍बस्‍फोट घडवले” : केरळ स्‍फोटाची जबाबदारी घेतलेल्‍या मार्टिनचा दावा

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : केरळमधील एर्नाकुलम येथे यहोवा पंथीय ख्रिश्‍चन समुदायाच्‍या एका सभागृहात रविवारी (दि.२९ ऑक्‍टोबर) सकाळी सलग तीन भीषण स्फोट झाले. यामध्‍ये तिघांचा मृत्‍यू झाला असून, ४५ हून अधिक जखमींवर उपचार सुरु आहेत. दरम्‍यान, या बॉम्‍बस्‍फोटाची जबाबदारी डोमिनिक मार्टिन या व्‍यक्‍तीने घेतली आहे. आपणच हे बॉम्‍बस्‍फोट घडवले तसेच यामागील कारणही त्‍याने एक व्‍हिडिओच्‍या माध्‍यमातून दिल्‍याचे वृत्त 'इंडिया टूडे'ने दिले आहे. (Kerala blast)

एर्नाकुलम येथे झालेल्‍या बॉम्‍बस्‍फोटानंतर काही तासातच त्रिशूर जिल्ह्यातील कोडकारा पोलिस स्टेशनमध्ये मार्टिन याने आत्मसमर्पण केले. त्‍याने स्फोटाची जबाबदारी स्‍वीकारली. पोलीस सध्या त्‍याची चौकशी करत आहेत. पोलिसांसमोर आत्‍मसमर्पण करण्‍यापूर्वी बॉम्‍बस्‍फोट का घडवून आणले याचे कारण सांगणारा एक व्‍हिडिओ मार्टिन याने सोशल मीडियावर व्‍हायरल केला.

Kerala blast : 'यहोवाचे साक्षीदार पंथाची शिकवणी देशद्रोही '

मार्टिन याने व्‍हायरल व्‍हिडिओमध्‍ये म्‍हटले आहे की, यहोवाचे साक्षीदार पंथाची शिकवणी 'देशद्रोही' असल्याने मी बॉम्‍बस्‍फोट घडवून आणण्‍याचा निर्णय घेतला. ( यहोवा साक्षीदार हा एक ख्रिश्चन पंथ आहे ज्याचा उगम 19व्या शतकाच्या उत्तरार्धात अमेरिकेमध्ये झाला. भारतात मोठ्या संख्येने त्‍याचे अनुयायी आहेत. )

मार्टिन याने दावा केला आहे की, "मी १६ वर्षांपासून यहोवाचे साक्षीदार पंथाशी संबंधित आहे. मला जाणवले की, यहोवा पंथाची संबंधित ही संस्‍थेची शिकवण देशद्रोही आहे., संस्थेला त्याच्या शिकवणी बदलावी यासाठी अनेकवेळा सांगितले;पण त्‍यांनी आपल्‍या विचारधारेत कोणतीही सुधारणा केली नाही. यहोवा पंथाच्‍या शिकवणी 'देशद्रोही' होत्या. त्याची विचारधारा राष्ट्रासाठी 'धोकादायक' होती. हा पंथ कोणाला मदत करत नाही किंवा कोणाचाही आदर करत नाही. त्‍यांना स्‍वत:चे अस्‍तित्‍व अबाधित ठेवून अन्‍य सर्वांचा नाश करावा, अशी त्‍याची विचारधार आहे, असा आरोपही मार्टिनने या व्‍हिडिओमध्‍ये केला आहे.

एर्नाकुलममधील कन्व्हेन्शन सेंटरमध्ये काय घडले याबद्दल मला माहिती नाही; परंतु या बॉम्‍बस्‍फोटाची संपूर्ण जबाबदारी घेत असल्‍याचेही त्‍याने या व्‍हिडिओमध्‍ये म्‍हटले आहे.

यहोवा पंथाची उत्पत्ती कशी झाली?

इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, यहोवा पंथाची स्थापना १८७० च्या दशकात अमेरिकेत चार्ल्स टेझ रसेल यांनी केली. त्यांनी अमेरिकेत 'बायबल स्टुडंट मुव्हमेंट'ची शाखा स्थापन केली.916 मध्ये रसेलच्या मृत्यूनंतर, जोसेफ फ्रँकलिन रदरफोर्ड या पंथाचा प्रमुख झाला. 1931 मध्ये या पंथाने यहोवाचे साक्षीदार हे नाव स्वीकारले. रदरफोर्डच्या नेतृत्वाखाली या पंथाची झपाट्याने वाढ झाली. या पंथाचे आज जगभरात सुमारे ८.५ दशलक्ष सदस्य आहेत.

भारतात सुमारे ५६,७४७ यहोवा साक्षीदार बायबल शिकवतात. जगाच्या इतर भागांप्रमाणेच भारतातही यहोवाचे साक्षीदार सार्वजनिक साक्षकार्यात भाग घेतात. ते अनेकदा बाजारपेठा आणि उद्यानांसारख्या सार्वजनिक ठिकाणी साहित्य स्टँड उभारतात. हे स्टँड त्यांच्या प्रकाशनांच्या मोफत प्रती देतात. यहोवाचे साक्षीदार वेळोवेळी भारतात अधिवेशने आणि सभा आयोजित करतात. हा पंथही शिक्षणावर भर देतो. भारतातील यहोवाचे साक्षीदार एक विस्तृत शैक्षणिक कार्यक्रम चालवतात ज्यात बायबल अभ्यास आणि इतर धार्मिक सूचना दिल्या जातात, असेही या रिपोर्टमध्‍ये नमूद करण्‍यात आले आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT