Latest

BPCL’s crude oil : शिळफाटा स्फोटामागील कारण आलं समोर बीपीसीएलच्या क्रूड ऑईलची टॅपिंगद्वारे चोरी 

सोनाली जाधव

नेवाळी (ठाणे) : पुढारी वृत्तसेवा : शिळफाटा परिसर शुक्रवारी (दि.१०) पहाटे स्फोटाच्या धक्क्याने हादरला होता. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. शनिवारी पहाटे आगीवरील नियंत्रणानंतर वास्तव तपासण्यासाठी बीपीसीएल कंपनीकडून सुरुवात करण्यात आली असता धक्कादायक प्रकार समोर आला आहे. क्रूड ऑइलची टॅपिंग द्वारे चोरी होत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता या ऑइल चोराचा शोध घेण्याचे आव्हान शासकीय यंत्रणांसमोर असणार आहे. (BPCL's crude oil)

शुक्रवारी (दि.१०) पहाटेच्या सुमारास शिळफाटा चौकात मोठ्या स्फोटामध्ये एकाला आपला जीव गमवावा लागला. शुक्रवारी पहाटे लागलेल्या आगीचे कारण समोर आले नसल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात हे अग्निशमन दलाच्या जवानांना अपयश येत होते. मात्र, बीपीसीएल कंपनीकडून ऑइल पुरवठा बंद करण्यात आल्यानंतर आग शनिवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास आटोक्यात आणण्यात आली आहे. आग आटोक्यात आल्यानंतर आगीची तीव्रता अधिक असलेल्या ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम सुरू केल्यानंतर टॅपिंग केल्याचे वास्तव समोर आले आहे.

BPCL's crude oil : कोण या मागील सूत्रधार?

टॅपिंग केलेल्या ठिकाणी गटार असल्याने ऑइल माफियांना बसण्यासाठी मोठी जागा देखील उपलब्ध झाली होती. त्यामुळे हे वास्तव समोर आल्यानंतर शिळ डायघर पोलिसांनी प्रसार माध्यमांसह अन्य कोणालाही त्या जागी प्रवेश करू दिला नाही. मात्र, गेल्या किती दिवसांपासून ऑइल चोरी या परिसरात सुरू होती? कोण या मागील सूत्रधार आहे. त्याचा शोध घेण्याचे आव्हान शासकीय यंत्रणांसमोर उभं ठाकलं आहे. सध्या घटनास्थळी बीपीसीएल कंपनीची पथक, टीडीआरएफ आणि अग्निशमन दलाचे जवान उपस्थित आहेत. मात्र, हे क्रूड ऑइल माफियाचे वास्तव दडपण्याच प्रयत्न सुरू असल्याची चर्चा परिसरात दबक्या आवाजात सुरू आहे. त्यामुळे टॅपिंग करून क्रूड ऑइल कुठे जात होते हे आता तपासानंतर उघड होणार आहे. क्रूड ऑइल चोरीचे वास्तव समोर आल्यानंतर कंपनीकडून अद्याप कोणत्याही प्रकारची तक्रार पोलिसात करण्यात आलेली नाही. त्यामुळे या क्रूड ऑइल चोरीची माहिती कंपनी प्रशासनाला कशी लागली नाही ? यामध्ये कंपनीमधील देखील मोठे मासे आहेत का ? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश

शुक्रवारी घडलेल्या घटनेनंतर स्थानिक आमदार प्रमोद(राजू)पाटील यांनी उप विभागीय अधिकारी अविनाश शिंदे, ठाणे तहसीलदार युवराज बांगर यांच्या सोबत घटनास्थळी भेट दिली होती. या नंतर तातडीने मनसेकडून मदतीची मागणी करण्यात आली होती. शुक्रवारी मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्या माध्यमातून नुकसान झालेल्या घरांचे आणि दुकानांचे पंचनामे करण्यात आले आहेत. मात्र त्यानंतर मदत कधी मिळणार हे पाहणं महत्वाच ठरणार आहे.

BPCL's crude oil : २१ तासांनी गूढ आलं समोर…

शिळफाटा चौकात झालेल्या स्फोटानंतर आगीची तीव्रता अधिक असल्याने अग्निशमन दलाला देखील कारण कळू शकत नव्हते. मात्र शनिवारी पहाटेच्या सुमारास तब्बल २१ तासांच्या कालावधीनंतर स्फोट आणि आगीचं कारण हे समोर आलं आहे. त्यामुळे आता बीपीसीएल कंपनी आणि प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.

चोरीसाठी गुफा देखील तयार

शिळफाटा चौक परिसरात क्रूड ऑइलची चोरी करण्यासाठी व्हॉल मुख्य वाहिनीला बसवण्यात आले आहे. त्यामधून दररोज क्रूड ऑइल चोरी सुरू असायची. मात्र, या प्रकरणाची कल्पना प्रशासनाला कशी नव्हती असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. क्रूड ऑइल चोरीसाठी एक गुफा देखील तयार करण्यात आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे क्रूड ऑइल लहान ड्रम भरून बाजारात विक्रीसाठी जात आहे. मात्र हा क्रूड ऑइल चोर कोण आहे. हे शोधण्याचे आव्हान शासकीय यंत्रणांसमोर असणार आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT