Latest

पोलिसी खाक्या दाखवला अन् इथे गुन्हेगारी चालते म्हणणारा तासाभरात आला गुडघ्यावर !

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  सोशल मीडियावर रील्स तयार करून गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणार्‍या आरोपीला पोलिसांनी चांगलाच धडा शिकवत एका तासाच्या आत माफी मागायला लावली. हडपसरचे नाव घेत तरुणाने गुन्हेगारीचा व्हिडीओ पोस्ट केला होता. हे हडपसर गाव ये… इथं दुनियादारी नाय… गुन्हेगारी चालते बादशाह.. असे म्हणत त्याने व्हिडीओ तयार केला होता. मात्र, पोलिसांच्या हा प्रकार निदर्शनास येताच काही तासांत गुन्हे शाखेने आरोपीवर कारवाई केल्याने हडपसरवासीयांनी समाधान व्यक्त केले.

पवन संतोष भारती (वय 20, रा. तरवडेवस्ती, महंमदवाडी) असे कारवाई करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले, तर त्याचा भाऊदेखील गुन्हेगार असून, नुकताच येरवडा कारागृहातून मोक्काच्या गुन्ह्यातून बाहेर आल्याचेदेखील पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला हडपसर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दरम्यान, त्याचे सोशल मीडियावर खाते आहे.

त्याने रील्सच्या माध्यमातून एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यात त्याने 'हे हडपसर गाव ये, इथे दुनियादारी नाही, इथं गुन्हेगारी चालती बादशहा', असा डायलॉग असणार्‍या या रील्सने हडपसरमधील गुन्हेगारीची धगधगदेखील समोर आली, तर दुसरीकडे हडपसरमधील तरुणाने रील्समधून थेट पोलिसांनाच एक प्रकारे आव्हान दिले होते. पोलिसांकडून मोक्का, एमपीडीए तसेच तडीपार अशा कारवाया केल्या जात आहेत. त्यानंतरही असे घडल्याने वरिष्ठांनी याची तत्काळ दखल घेतली व या तरुणाचा शोध सुरू केला.

गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर तसेच युनिट सहाच्या पथकाचे वरिष्ठ निरीक्षक रजनिश निर्मल व त्यांच्या पथकाने तरुणाचा शोध घेतला. त्यावेळी पोलिस नाईक नितीन मुंढे, संभाजी सकटे यांना तो तरुण पवन भारती असून, तो शिंदे वस्ती येथील इंडस्ट्रियल एरिया येथे थांबला आहे, अशी माहिती मिळाली. लागलीच पथकाने शिंदे वस्तीतून पवनला ताब्यात घेतले.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT