पुढारी ऑनलाईन : दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे हे नेहमीच प्रेक्षकांसाठी काहीतरी भन्नाट विषय घेऊन येतात. यापूर्वी त्यांनी फॅंड्री, सैराट, नाळ यांसारखे सुपरहिट आणि वेगळ्या धाटणीचे चित्रपट मराठी सिनेसृष्टीला दिले आणि आता 'घर बंदुक बिरयानी' ( Ghar Banduk Biryani ) हा एक वेगळा विषय ते चाहत्यासाठी घेऊन येत आहेत. टीझरने चित्रपटाची उत्सुकता अधिकच वाढवली असून या चित्रपटातील गाण्यांना लाखोंहून अधिक व्ह्यूज मिळत आहेत.
संबधित बातम्या
हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित या चित्रपटात नागराज पोपटराव मंजुळे, सयाजी शिंदे, आकाश ठोसर आणि सायली पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'घर बंदूक बिरयानी' ( Ghar Banduk Biryani ) असा एकमेव मराठी चित्रपट आहे जो एकाच वेळी मराठी, हिंदी, तामिळ आणि तेलुगु भाषेत प्रदर्शित झाला आहे.
टीझरमध्ये पोलीस आणि डाकूंची चकमक दिसत असून हा पाठलाग कशासाठी आहे? आणि यातून काय निष्पन्न होणार आहे?, हे चित्रपट बधितल्यानंतर कळणार आहे. दरम्यान या चित्रपटात प्रेम कहाणीही खुलताना दिसत आहे. या चित्रपटातील प्रत्येक गाणे श्रवणीय आणि सुंदररित्या चित्रित करण्यात आले आहे. आशिष कुलकर्णी आणि कविता राम यांचा सुमधुर आवाज लाभलेले 'गुन गुन' हे गाणे प्रत्येकाच्या ओठांवर रेंगाळणारे आहे.
'आहा हेरो' या जबरदस्त गाण्याला प्रवीण कुवर, विवेक नाईक, संतोष बोटे, राहुल चिटणीस यांचा आवाज लाभला असून गणेश आचार्य यांचे या गाण्याला नृत्य दिग्दर्शन लाभलं आहे. तर 'घर बंदूक बिरयानी' हे टायटल सॉन्ग बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक मोहित चौहान यांनी गायिले आहे. चित्रपटातील गाण्यांना ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी संगीत दिले असून वैभव देशमुख यांनी गाणी शब्दबद्ध केली आहेत.
निर्माते नागराज पोपटराव मंजुळे म्हणतात की, 'चित्रपटाबद्दल फारसे काही सांगणार नाही. चित्रपटाची कथा चांगली आहे, त्यानुसार गाण्यांचेही लेखन झाले आहे आणि त्याला साजेसे असे संगीत आहे. या चित्रपटात नेमके काय आहे?, हे प्रेक्षकांना २४ सप्टेंबरलाच कळेल.' 'घर बंदूक बिरयानी' चा वर्ल्ड टीव्ही प्रीमियर येत्या २४ सप्टेंबरला पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा :