Latest

पुणे मेट्रो : संभाजी पुलावरील काम अखेर तडीस; पोलिस बंदोबस्तात काम फत्ते

अमृता चौगुले

पुणे; हिरा सरवदे : संभाजी पुलावरील बहुचर्चित मेट्रोचे ( पुणे मेट्रो ) काम पोलिसांच्या कडक बंदोबस्तामध्ये गुरवारी रात्री 11 च्या सुमारास मेट्रो प्रशासनाने हाती घेतले. हे काम शुक्रवारी सकाळपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मेट्रोच्या अधिकार्‍यांनी दिली.

वनाज ते रामवाडी मेट्रो ( पुणे मेट्रो ) मार्गावर वनाज डेपो ते गरवारे महाविद्यालय स्थानकापर्यंतचे मेट्रो मार्गीकीचे काम बर्‍यापैकी झाले आहे. नदीपात्रातील सर्वच पिलर्स उभे राहुन बहुतांश काम पूर्ण झाले आहे. मात्र संभाजी पुलावरून जाणारा मेट्रो मार्ग गणेश विसर्जन मिरवणुकीतील देखाव्यांना अडचणीचा ठरणार असल्याचा आरोप करत शहरातील काही गणेश मंडळांनी विरोध केला होता.

त्यानंतर महापौर मुरलीधर मोहोळ, मंडळांचे प्रतिनिधी, विरोधी पक्षांचे नगरसेवक, मेट्रो, वाहतूक पोलिस यांच्या संयुक्त बैठका घेवून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र योग्य पर्याय समोर येऊ शकला नाही. त्यामुळे महापौरांनी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना हट्ट सोडण्याची विनंती केली होती. मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत मध्ये नसल्याचे पाहून काम सुरू करण्याच्या सुचना मेट्रो प्रशासनाला केल्या होत्या. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मुंबईत बैठक घेवून पोलिस बंदोबस्तामध्ये काम करण्याचे आदेश दिले होते.

संभाजी पुलावरील पुणे मेट्रोचे सुरु असलेले कार्य

विरोधामुळे तीन महिने थांबलेले काम मंगळवारी रात्री सुरू होणार होते. मात्र, महापालिकेच्या मुख्यसभेत राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस व मनसेच्या नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन करत विरोध केला होता. तर गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी सभागृहाबाहेर घोषणाबाजी करत आंदोलन केले. या गोंधळामुळे महापौरांनी मुख्यसभा गुरुवार पर्यंत तहकूब केली होती.

महापालिकेच्या गुरुवारच्या मुख्यसभेत पुन्हा गोंधळ होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, सभेत या प्रश्नावर कोणी ब्र शब्दही काढला नाही. त्यानंतर मेट्रो प्रशासनाने तगडा पोलिस बंदोबस्त घेवून गुरुवारी रात्री 11 च्या सुमारास थांबलेले काम पुन्हा हाती घेतले. तब्बल 48 टन वजण आणि 50 मीटर लांबी असलेले तीन मीटरल उंचीचे स्टीलचे दोन गर्डर पहाटेपर्यंत दोन क्रेनच्या सहाय्याने बसविले जाणार असल्याचे मेट्रोच्या अधिकार्‍यांनी सांगितले. यासाठी एक्सपर्ट टिम, लिफ्टींग ऑफरेशन टिम, उभारणी टिम असे एकूण शंभर कर्मचारी कार्यरत करण्यात आले.

संभाजी पुलाच्या दोन्ही बाजूस कडेकोट बंदोबस्त  ( पुणे मेट्रो )

गणेश मंडळांसह महापालिकेतील विरोधी पक्षांनी संभाजी पुलावरील मेट्रोच्या कामाला विरोध केल्याच्या पार्श्वभूमीवर मेट्रोचे काम हाती घेतल्यानंतर पुलाच्या दोन्ही बाजून आणि खंडूजीबाबा व टिळक चौकात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जंगली महाराज रस्त्यावरून येणारी वाहने गोखले रस्त्याकडे (फर्ग्युसन) वळवण्यात आली होती. तर कोथरुडकडून येणार्‍या वाहनांना संभाजी पुलाकडे जाण्यास मज्जाव करून ती गोखले रस्त्याकडे वळवण्यात येत होती. तसेच टिळक चौकातून पूलाकडे जाणारे दोन्ही रस्ते बंद करून वाहतूक केळकर रस्त्याकडे वळवण्यात आली होती. या बंदोबस्तासाठी जवळपास 75 पोलिस कर्मचारी व 6 अधिकारी तैनात करण्यात आल्याचे डेक्कन पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक मुरलीधर करपे यांनी सांगितले.

पुणे मेट्रो कडून संभाजी पुलावरील सुरु असलेल्या कामासाठी पोलिसांनी ठेवलेला कडक बंदोबस्त

पोलिसांचा तगडा बंदोबस्त पाहून कार्यकर्त्यांचा काढता पाय  ( पुणे मेट्रो )

मेट्रोच्या कामाला विरोध करणार्‍या कार्यकर्त्यांना काम सुरू होत असल्याची कुणकुण लागताच कार्यकर्ते खंडूजी बाबा चौकात जमा झाले होते. पोलिसांची नजर आपल्यावर पडू नये म्हणून हे कार्यकर्ते आडबाजूला उभे राहिले होते. यामध्ये कृती समितीचे काही सदस्यही होते. मात्र पोलिसांचा तगडा बंदोबस्त पाहून गुन्हे दाखल होतील या भितीने कोणतीही गडबड न करता त्यांनी काढता पाय घेतला.

SCROLL FOR NEXT