Latest

लोपणारी आखाडी उर्जितावस्थेत !

अमृता चौगुले

पोहेगाव ( नगर ) : पुढारी वृत्तसेवा :  'दौलत दादा मेहेरबान, सलाम, बाजूसे बाजू, कदमसे कदम, श्रीगणेश महाराज की स्वारी आ रही हैं, निगा रखो महाराज,' असे म्हणत सूत्रधाराने आवाज दिला अन् दशावतारी आखाडी उत्सवाचा कोपरगाव तालुक्यातील नगदवाडी, सोनेवाडी मध्ये श्रीगणेशा झाला. लुप्त होणार्‍या आखाडीला पुन्हा उर्जित अवस्था देण्याचे काम ग्रामस्थांनी केले. दरम्यान, उद्या 11 जुलैपर्यंत सार्वजनिक आखाडी उत्सव सुरू असणार आहे.

आखाडी उत्सव मंडळ, नगदवाडी व सोनेवाडी ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने लोकवर्गणीतून कार्यक्रम यशस्वी वाटचाल करीत आहे. पूर्वी महाराष्ट्रमध्ये सर्वत्र आखाडी उत्सव साजरे केले जायचे, मात्र टीव्ही, व्हाट्सअप, फेसबुक व मोबाईलच्या वापरामुळे जुन्या पारंपरिक छंदांकडे लक्ष द्यायला माणसाला वेळ नाही. पूर्वी करमणुकीचे साधन म्हणून या उत्सवाकडे पाहिले जायचे. 5 व्या दिवशी रावण तर 7 व्या दिवशी नरसिंह या आखाडीतील सोगांना कोण नाचवणार, यासाठी स्पर्धा असायची. अगदी मानाच्या गोष्टीप्रमाणे याकडे पाहिले जायचे. एखाद्याला महत्त्वाचे सोंग मिळाले नाही तर एक आखाडी उत्सव संपला की, दुसरा लगेच सुरू व्हायचा, मात्र कालौघामध्ये हे लुप्त पावत आहे. 8 वर्षांपासून नगदवाडी, सोनेवाडीत आखाडी उत्सव झाला नव्हता, मात्र उत्साही कार्यकर्त्यांच्या नियोजनामुळे उत्सव पुन्हा नव्या दमाने उभा राहिला.

आखाडीत सोंगांना जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व सोंग नाचवण्यासाठी लोकनाट्य तमाशा मंडळाला आहे. आखाडी उत्सवात संगीता महाडिक पुणेकर यांची प्रेरणा घेत लोककला तमाशा मंडळ मनोरंजन करीत आहे. हळू-हळू महाराज आज्ञा स्वीकारावी, असे म्हणत 5 व्या दिवशी रावणाचा दरबार भरतो. काळकंठ, निळकंठ आदी सेनापती रावणाची वाहऽऽ वा करतात. तर श्रीराम- लक्ष्मण यांच्या बाजूने बिभिशन कर्तव्य बजावतो. विश्व मित्रांची स्वारी प्रेक्षकांना आकर्षित करते. उद्या आखाडी समाप्ती होत आहे.

हे ही वाचा : 

SCROLL FOR NEXT