Latest

Corona Third Wave : तिसर्‍या लाटेतून राज्य बाहेर! पुणे, नागपूर वगळता मुंबईसह उर्वरित महाराष्ट्राला दिलासा

backup backup

मुंबई/नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत सोमवारी नोंदवली गेलेली घट पाहता पुणे, नागपूर वगळता मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाच्या तिसर्‍या लाटेतून बाहेर आल्याचे मोठे दिलासादायक वृत्त असून, देशभरातही सोमवारी रुग्णसंख्येत मोठी घट नोंदवली गेली. (Corona Third Wave)

सोमवारी महाराष्ट्रात 6 हजार 436 रुग्णांची नोंद झाली, तर 18 हजार 423 रुग्ण बरे झाले. राज्यात सध्या 1 लाख 6 हजार रुग्ण सक्रिय आहेत. सोमवारी पुणे सर्कलमध्ये सर्वाधिक 1744 नवे रुग्ण आढळले. त्या खालोखाल नागपूर सर्कलमध्ये 1044 रुग्णांची भर पडली.

Corona Third Wave : राज्यात एकाही ओमायक्रॉन रुग्णाची नोंद नाही

अन्य सर्कल्सपैकी अकोला सर्कलमध्ये 205, लातूर सर्कलमध्ये 283, औरंगाबाद सर्कलमध्ये 464 आणि कोल्हापूर सर्कलमध्ये 328 नवे रुग्ण आढळले. राज्यात एकाही ओमायक्रॉन रुग्णाची नोंद झाली नाही.

मुंबईतही सोमवारी कोरोना रुग्णांमध्ये मोठी घट झाली. 24 तासांत अवघ्या 356 रुग्णांची नोंद झाली, तर 5 जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात 949 रुग्ण बरे झाले. सक्रिय रुग्णांची संख्या 5 हजार 139 इतकी खाली आली आहे.

2 टक्क्यांवर पोहोचलेला रुग्णवाढीचा दर 0.09 टक्के इतका खाली आला आहे, तर एकाच इमारतीत 10 पेक्षा जास्त रुग्ण सापडल्यामुळे आता संपूर्ण मुंबईत आजघडीला फक्त एक इमारत सील आहे. ठाण्यातही सोमवारी फक्त 217 नवे कोरोना रुग्ण सापडले. दिवसभरात तीन रुग्णांचा मृत्यू झाला.

साथरोगतज्ज्ञ आणि युनिसन मेडिकेअर अँड रिसर्च सेंटरचे सल्लागार डॉ. ईश्वर गिलाडा यांनी दै. 'पुढारी'ला सांगितले की, गेले तीन आठवडे महाराष्ट्रात रुग्णसंख्येत रोज घट दिसते आहे.

मुंबईतील टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट एक टक्क्यापेक्षाही कमी येत आहे. याचा अर्थ मुंबई तिसर्‍या लाटेतून आहेर आलेली दिसते. पुणे आणि नागपूर वगळता उर्वरित महाराष्ट्रही कोरोनाच्या तिसर्‍या लाटेतून बाहेर पडला आहे.

देशातही मोठी घट

दरम्यान, देशातही महिनाभरानंतर 1 लाखाहून कमी रुग्ण सोमवारी आढळले आहेत. रविवारी दिवसभरात 83 हजार 876 कोरोनाग्रस्तांची भर पडली, तर 895 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. दरम्यान, 1 लाख 99 हजार 54 रुग्णांनी कोरोनावर मात केली.

सोमवारी देशाचा कोरोनामुक्ती दर 96.19 टक्के नोंदविण्यात आला. यापूर्वी 5 जानेवारीला देशात 91 हजार कोरोनाबाधित आढळले होते. सोमवारी देशाचा दैनंदिन कोरोना संसर्गदर 7.25 टक्के, तर आठवड्याचा कोरोना संसर्गदर 9.18 टक्के नोंदविण्यात आला.

SCROLL FOR NEXT